मुंबई, 24 ऑगस्ट : मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज (२४ ऑगस्ट) सकाळी वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही वर्षांपासून सीमा देव या अल्झायमर या आजाराशी झुंज देत होत्या.
सीमा देव यांची कारकीर्द –
आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी अवघ्या रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. अभिनेत्री सीमा देव यांनी मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले होते. 1971 मध्ये रिलीज झालेल्या ‘आनंद’ चित्रपटातही त्यांनी काम केले होते. या चित्रपटात सीमा देव यांनी श्रीमती सुमन कुलकर्णी यांची भूमिका साकारली होती.
तसेच सीमा देव यांनी ‘कोशिश’ आणि ‘सरस्वतीचंद्र’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘माझी आई’, ‘सुवासिनी’, ‘सोनियाची पावले’, ‘मोलकरीण’ यांसारख्या अनेक चित्रपटांत रमेश देव यांच्यासह भूमिका साकारल्या.‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘पाहू रे किती वाट’, ‘अपराध’, ‘या सुखांनो या’ या चित्रपटांतील सीमा यांच्या भूमिका गाजल्या. 1963 सालच्या ‘पाहू रे किती वाट’ या चित्रपटातील भूमिकेसाठी महाराष्ट्र सरकारचा सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार सीमा यांना मिळाला.