चंद्रकांत दुसाने/ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 3 सप्टेंबर : जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून “जिल्हा परिषद आपल्या दारी” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत पाचोरा शहरातील स्व.तात्यासो आर. ओ. पाटील व्यापारी भवनात आज 3 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 2 वाजेच्या दरम्यान तक्रार निवारण सभा पार पडली. या तक्रार निवारण सभेत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी तक्रारींचा पाढा वाचला. दरम्यान, आमदार किशोर आप्पा पाटील तसेच सीईओ मिनल करनवाल यांनी नागरिकांच्या तक्रारी समजून घेत प्रशासनातील अधिकाऱ्यांना महत्त्वपुर्ण आदेश दिले.
पाचोऱ्यात तक्रार निवारण सभेत मांडण्यात आल्या तक्रारी –
पाचोरा शहरातील व्यापारी भवनात आयोजित केलेल्या तक्रार निवारण सभेसाठी सकाळी 50 हून अधिक ग्रामपंचायत सरपंच, सदस्य तसेच नागरिकांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या. यानंतर टोकन नंबर दिल्यानुसार तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारी मांडल्या. घरकूल, अतिक्रमण तसेच शौचालयाच्या शासकीय निधीमध्ये अपहार, बोगस डॉक्टर, शेतरस्ते, गावातील रस्ते, आरोग्य, पाणी पुरवठा, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे वेतन तसेच ग्रामसेवकांची गैरहजेरी इत्यांदी मुद्यांसंदर्भातील तक्रारींचा समावेश होता.
सीईओ-आमदारांचे प्रशासनास महत्त्वपुर्ण आदेश –
पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील तसेच जिल्हा परिषेदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून घेत तक्रार निवारण सभेत उपस्थित असलेले ग्रामसेवक, सरपंच तसेच प्रशासनातील विभागनिहाय अधिकारी यांना तात्काळ तक्रारींचा निपटारा करण्याचे महत्वपुर्ण आदेश दिले. तसेच काही प्रकरणांच्या तक्रार निवारणाची जबाबदारी मिनल करनवाल यांनी स्वतः स्विकारत तात्काळ त्या तक्रारी सोडविण्याचे आश्वासन दिले.
सर्वाधिक तक्रारी लोहारी ग्रामपंचायतबाबत –
पाचोऱ्यातील तक्रार निवारण सभेत सर्वाधिक तक्रारी ह्या लोहारी ग्रामपंचायतबाबत करण्यात आल्या. यामुळे आमदार किशोर आप्पा पाटील तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लोहारी ग्रामपंचायतबाबतच्या तक्रारींच्या निवारणासाठी लवकरच आमसभा आयोजित करण्याचे तक्रारदारांना आश्वासन दिले.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
तक्रार निवारण सभेच्या समारोपप्रसंगी बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, तक्रार निवारण सभेत अनेक तक्रारदारांच्या तक्रारीचे निवारण करण्यासंदर्भात प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच तक्रार निवारण सभेसाठी नोंदणी करण्यात आलेल्या उर्विरत तक्रारदारांच्या तक्रारी ह्या जिल्हा परिषद सीईओ मिनल करनवाल यांना प्राप्त झाल्याचे ग्राह्य धरून येत्या आठ दिवसाच्या आत गटविकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने ग्रामसेवकांमार्फत नावासह तक्रारदारांपर्यंत तक्रारींचे निवारण पोहचेल.
आमदारांनी केलं सीईओंचं कौतुक –
आमदार किशोर आप्पा पाटील बोलताना पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी थेट “जिल्हा परिषद आपल्या दारी” असा नाविन्यपुर्ण उपक्रम जळगाव जिल्ह्यात राबवत नागरिकांच्या अनेक महिने तसेच वर्षांपासूनच्या तक्रारी निवारण्याचे काम यामाध्यमातून केलंय. यामुळे मी त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करतो.
रस्ते कामांच्या निधीसंदर्भात आमदारांनी सीईओंना केले आवाहन –
जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांची वर्षांनुवर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था आहे. यामुळे माझ्या तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व रस्त्यांची कामे डीपीसीमधून पुर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री यांच्यापर्यंत प्रस्ताव द्यावा आणि जास्तीत जास्त निधी माझ्या जिल्हा परिषदेच्या रस्त्यांसाठी द्यावा, असे आवाहन जनतेच्यावतीने आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सीईओ मिनल करनवाल यांना केले.
बंधाऱ्यांच्या पाट्या दुरूस्तीसाठी प्रयत्न करावे –
तसेच पाचोरा-भडगाव तालुक्यात असलेल्या कोल्हापुरी तसेच इतर बंधाऱ्यांच्या पाट्या देखील खराब अवस्थेत आहे. म्हणून आपल्या माध्यमातून सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना बंधाऱ्यांच्या पाट्या दुरूस्तीसाठी प्रस्ताव द्यावा. यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पाण्याची अडचण येणार नाही, असेही आमदार किशोर आप्पा पाटील सीईओ मिनल करनवाल यांना म्हणाले.
आरोग्य केंद्रांवर पुरेशा औषधसाठा उपलब्ध ठेवावा –
पाचोरा-भडगाव तालुक्यातील आरोग्य केंद्रांवर डॉक्टरांची उपलब्धत करावी. याचबरोबर असा एकही रूग्ण नसावा की, विना औषध आरोग्य केंद्रावरून रूग्णांनी परत येऊ नये. यामुळे आरोग्य केंद्रावरील औषध साठ्याच्या उपलब्धतेबाबत दखल घेऊन 100 टक्के औषधसाठा संबंधित आरोग्य केंद्रांवर उपलब्ध करण्यात यावा, असेही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले.
शेतरस्त्यांसंदर्भात आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
पाचोरा-भडगाव तालुक्यात शेतरस्त्यांचा देखील विषय प्रलंबित आहे. म्हणून मी स्वतः पावसाळी अधिवेशनात शेत रस्त्यांचा मुद्दा उपस्थित केला आणि याची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून महाराष्ट्रातील शेतरस्त्यांच्या विषय मार्गी लावण्याचे आदेश दिले. दरम्यान, शेतरस्त्यांसंदर्भात राज्य सरकारचा नवा शासन निर्णय प्राप्त झाला असून आता प्रत्येक शेत रस्त्यांना नंबर देऊन येत्या पाच वर्षांच्या कार्यकाळात 100 टक्के शेतरस्त्यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी कार्यवाही करण्यासाठी महायुतीचे सरकार तत्पर असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले. तर दुसरीकडे शेतरस्ते मोकळे करण्यासाठी ग्रामसेवक तसेच सरपंचांनी आग्रही भूमिका घेऊन इंग्रजांच्या काळापासून 25 फुटांचे अधिकृत असलेले शेतरस्ते शेतकऱ्यांना खुला करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असेही आमदार पाटील म्हणाले.
नगरदेवळा आणि पिंपळगाव (हरे.) येथे नगरपरिषद होण्यासाठी पाठपुरावा करावा –
नगरदेवळा आणि पिंपळगाव (हरे.) या ग्रामपंचायतीचा नगरपरिषदेसाठी आम्ही प्रस्ताव पाठवला आला असून तो अंतिम टप्प्यात आहे. जसं जिल्हा परिषेदची अधिसूचना निघाल्यानंतरही नशिराबादच्या नगरपरिषदेची घोषणा झालीय. या धर्तीवर नगरदेवळा आणि पिंपळगाव (हरे.) या ग्रामपंचायतीच्या नगरपरिषद होण्यासाठी जिल्हा परिषेदच्या माध्यमातूनही पाठपुरावा करण्यात यावा, असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सीईओ करनवाल यांना केले.
‘या’ ग्रामपंचायतींना जास्तीचा निधी द्यावा –
जारगाव तसेच पुनगाव ग्रामपंचायती ह्या पाचोरा शहराला लागून आहेत. या गावांना 2011 च्या जणगणनेप्रमाणे निधी मिळतो. मात्र, तो निधी पुरेसा नाही. म्हणून डीपीसीच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून जारगाव तसेच पुनगाव या ग्रामपंचायतींना जास्तीचा निधी देण्यात यावा, अशी मागणीही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केली.
यांची होती उपस्थिती –
तक्रार निवारण सभेच्या सुरूवातीला पाचोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी के.बी. अंजने यांनी प्रास्तविक मांडले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन बोरसे यांनी केले. याप्रसंगी जिल्हा परिषेदेतील अधिकारी, पाचोरा पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर.एस. लोखंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी जि.प. सदस्य रावसाहेब पाटील, माजी जि.प. सदस्य मधूकर काटे, माजी जि.प. सदस्य पदमसिंग पाटील, पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी पंकज पाचपोळ, माजी नगरसेवक महेश सोमवंशी, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, शिवशक्ती-भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष प्रविण ब्राम्हणे, यांच्यासह पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच तसेच ग्रामविकास अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.