परभणी, 3 ऑगस्ट : राज्यातील महायुती सरकारमधील मंत्र्यांचे वादगस्त वक्तव्यं चर्चेत असतानाच अजून एका महिला मंत्र्यांचा ग्रामसेवकावर संतापल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री मेघना बोर्डीकर यांचा ग्रामसेवकावर संताप केल्याचा व्हिडिओ ‘एक्स’वर पोस्ट करत सरकारवर टीका केली आहे.
मंत्री मेघना बोर्डीकर ग्रामसेवकावर संतापल्या –
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कार्यक्रमातील व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी ट्विट केला आहे. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून ज्यामध्ये त्या एका अधिकाऱ्याला कानाखाली मारेन असे म्हणताना पाहायला मिळते. दरम्यान, आताच्या आता बडतर्फ करेल, असा इशारा देखील त्यांनी त्या ग्रामसेवकाला दिलाय. या व्हिडिओत मंत्री मेघना बोर्डीकर ग्रामसेवकावर संतापल्याचं दिसून येते.
View this post on Instagram
आमदार रोहित पवार यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट –
सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचे टार्गेट पूर्ण केले नाही, म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात?, असा सवाल करत परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डिकर यांचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यानी एक्सवर पोस्ट केलाय. देवेंद्र फडणवीस साहेब काय सज्जन मंत्री शोधलेत आपण! तुमच्या मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच, पण यापेक्षाही महाराष्ट्राची बेअब्रू होतेय, याची जास्त चिंता आहे, असेही आमदार पवार यांनी म्हटलंय.
मंत्री मेघना बोर्डीकर यांचं स्पष्ठीकरण –
व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत स्पष्ठीकरण देताना मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, रोहित पवार यांनी अर्धवट माहितीच्या आधारे राज्यातील जनतेची दिशाभूल करू नये. बोरी येथील विधवा तसेच मोलमजुरी करणाऱ्या सामान्य महिलांचा पंतप्रधान आवास योजनेच्या लाभासाठी हा ग्रामसेवक छळ करतो आणि त्यांच्याकडे पैशांची मागणी करतो. याबाबतच्या तक्रारी येत होत्या.
दरम्यान, त्याची वारंवार तक्रार करूनही तो ऐकत नव्हता. अशातच त्या कार्यक्रमात काही महिला माझ्याकडे आल्या. त्यामुळे मी एक पालक या नात्याने ग्रामसेवकाला ज्या भाषेत कळते त्याच भाषेत समज दिली असून मी त्या रागातून संबंधित ग्रामसेवकाला बोलले, असे मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ठ केलंय. माझा तो त्रागा मी जे बोलले, ते माझ्या लाडक्या बहिणींसाठी बोलले, असेही त्या म्हणाल्या.