चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव – विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक असा विजय मिळवला आहे. जळगाव जिल्ह्यातही महायुतीने 11 पैकी 11 जागा जिंकत जळगाव जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे. मात्र, मतदान झाले, निकाल लागला, महायुतीने ऐतिहासिक विजयही मिळवला. यानंतर आता राज्यात मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते आणि जळगाव जिल्ह्यातून कुणाकुणाला मंत्रीपदाची संधी मिळते, याकडे आता जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या अभुतपूर्व यशानंतर आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर सर्व आमदार मुंबईत पोहोचले आहेत. यानंतर आता लवकरच नवीन सरकार स्थापन होणार असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
शिंदे सरकारच्या काळात जळगाव जिल्ह्याला 3 कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली होती. यामध्ये शिंदेसेनेचे गुलाबराव पाटील, भाजपचे गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनिल पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली होती. मात्र, यासोबतच शिंदेच्या मंत्रिमंडळात जळगाव जिल्ह्याला एकही राज्यमंत्रीपद मिळाले नव्हते. त्यामुळे यावेळी जळगाव जिल्ह्याला किती आणि कोणती मंत्रीपदे मिळतात, याची संपूर्ण जळगाव जिल्ह्याला उत्सुकता लागली आहे.
हे असू शकतात संभाव्य कॅबिनेट मंत्री –
- संभाव्य मंत्र्यांचा विचार केला असता, शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील यांना संधी मिळू शकते. गुलाबराव पाटील हे उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्येही कॅबिनेट मंत्री होते. तसेच शिंदेंच्या सेनेचे नेतेपदही त्यांच्याकडे आहे. ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहे. त्यामुळे यावेळीही महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
- गिरीश महाजन हे भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यांना भाजपचे संकटमोचकही म्हटले जाते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री बनवले होते. यंदा त्यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे ते यशस्वी झाले असून त्यामुळे यंदाही त्यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यांना कोणते खाते मिळते, याकडेही जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
- राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनिल पाटील यांना शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली. यंदा ते खान्देशात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने निवडून आलेले एकमेव उमेदवार आहेत. त्यामुळे खान्देशात आपल्याला प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आग्रही राहील. त्यामुळे अनिल पाटील यांना पुन्हा मंत्रीपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
या नावांचीही होतेय चर्चा –
- जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे. त्यामुळे आपण मंत्रीपदासाठी पात्र असून यावेळी आपला विचार नक्की केली जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना पक्षफुटीनंतर त्यांनी शिंदेसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि यानंतर आता तिसऱ्यांदा ते विजयी झाले असून त्यांनाही मंत्रिपदाची संधी मिळू शकते, असे बोलले जात आहे.
- भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना सलग चौथ्यांदा विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे ते आधी आघाडीच्या सरकारमध्ये राज्यमंत्रीही राहिले आहे. त्यामुळे तेसुद्धा मंत्रीपदाच्या स्पर्धेत असून त्यांना महायुतीच्या सरकारमध्ये संधी मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
- जळगाव शहराचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे. त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवार जयश्री महाजन यांचा पराभव केला. तसेच ते लेवा पाटील समाजाचे असल्याने या समाजालाही मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळावे, म्हणून भाजपकडून त्यांनाही संधी दिली जाऊ शकते, असे बोलले जात आहे.
- चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचे एकेकाळचे मित्र राहिलेले माजी खासदार आणि ठाकरे गटाचे उमेदवार उन्मेश पाटील यांचा पराभव करत दुसऱ्यांना विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. त्यांची ही दुसरी टर्म असली तरी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी मंगेश चव्हाणांना निवडून दिल्यास त्यांना मोठी संधी देऊ, असे भाष्य केले आहे. तसेच ते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने त्यांना यावेळी मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
Kishor Appa Patil Hattrick : ऐतिहासिक विजयानंतर आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? पहिलीच मुलाखत..