चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 3 जून : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी देशात सात टप्प्यात तर राज्यात पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली. यामध्ये खान्देशात जळगाव, रावेर आणि नंदुरबार या लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात तर धुळे येथे पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान, या मतदान प्रक्रियेनंतर बहुचर्चित असलेले परिणाम निकालाच्या माध्यमातून समोर येणार आहेत. देशात उद्या लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या लोकसभा निवडणूकीत खान्देशातील चारही लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? याचा प्राथमिक आढावा ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’च्या लोकसभा निवडणूक निकाल या स्पेशल रिपोर्टमधून घेण्यात आलाय.
जळगाव लोकसभा मतदारसंघ
जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपच्या स्मिता वाघ तर महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे करण पवार यांच्यात ही लढत पार पडतेय. जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिलाय. मात्र, यंदाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांनी स्मिता वाघ यांच्यासमोर आव्हान उभे केल्याने ही लढत चुरशीची ठरलीय. तसेच उन्मेश पाटील यांचे तिकीट कापल्याने त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर जळगावात थेट उन्मेश पाटील विरूद्ध गिरीश महाजन असा राजकीय सामना पाहायला मिळाला. दरम्यान, महायुतीच्या नेत्यांकडून जळगावात राष्ट्रीय मुद्यांवर प्रचार केला गेला असताना उन्मेश पाटील यांच्यासह करण पवार यांनी स्थानिक मुद्यांवर भर देत ही निवडणूक लढवली. याचा स्मिता वाघ यांना मिळणाऱ्या मतांवर देखील परिणाम झाला. मात्र, लोकसभा निवडणूकीच्या निकालात जळगाव लोकसभा मतदारसंघात स्मिता वाघ कमी मतांनी विजयी होतील, अशी शक्यता आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघ –
रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजप खासदार रक्षा खडसे ह्या तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांचे आव्हान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघावर वर्चस्व राहिले आहे. असे असताना एकनाथ खडसेंनी भाजपात जाणार असल्याच्या घोषणेमुळे याचा रावेर लोकसभा मतदारसंघात मोठा प्रभाव पडल्याने प्रचारादरम्यान रक्षा खडसेंना याची मोठी मदत झाल्याचे दिसून आले आहे. परिणामी रक्षा खडसे श्रीराम पाटलांचा पराभव करत तिसऱ्यांदा खासदार बनतील, अशी दाट शक्यता आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघ –
धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजप खासदार डॉ. सुभाष भामरे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्यात लढत पार पडतेय. काँग्रेसकडून शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध दिसून आला होता. कालांतराने तो विरोध दूर होऊन पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रचारास सुरूवात केली होती. तसेच धुळे लोकसभा मतदारसंघात शोभा बच्छाव यांना मुस्लिम मतदारांचा देखील मोठ्या प्रमाणात पाठिेंबा मिळाला. तर दुसरीकडे डॉ. सुभाष भामरे गेल्या दहा वर्षांपासून धुळ्याचे खासदार आहेत. मात्र, त्यांनी मतदारसंघात कामे केली नसल्याचा देखील स्थानिक मतदारांचा आरोप आहे. असे असताना देखील डॉ. सुभाष भामरे पुन्हा तिसऱ्यांदा खासदारपदी निवडून येतील, अशी तेथील राजकीय परिस्थिती आहे.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ –
धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजप खासदार डॉ. हिना गावीत तर काँग्रेसचे अॅड. गोवाल पाडवी यांच्यात ही चुरशीची लढत पार पडतेय. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड मानला जात होता. मात्र, दहा वर्षांपुर्वी हिना गावीत पहिल्यांदा खासदार बनल्याने भाजपने काँग्रेसला धक्का दिला होता. यानंतर हिना गावीत ह्या सलग दहा वर्षांपासून खासदार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी हिना गावीत यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केलेय. उच्चशिक्षित, अभ्यासू आणि युवा आदिवासी चेहरा म्हणून गोवाल पाडवी यांच्याकडे पाहिले जाते. यामुळे त्यांना नंदुरबारात मोठ्या प्रमाणात समर्थन देखील मिळाल्याचे दिसून आले.
हिना गावीत यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांसारख्या दिग्गजांच्या सभा पार पडल्या. यातून पुन्हा एकदा भाजपच्याबाजून वातावरण निर्मिती करण्याचे प्रयत्न केले गेले. असे असताना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारात आली होती. तसेच प्रचारादरम्यान प्रियंका गांधींची याठिकाणी सभा पार पडल्यामुळे नंदुरबारात काँग्रेसच्या बाजून वातावरण तयार झाल्याचे दिसून आले. यामुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात यंदा गोवाल पाडवी बाजी मारणार असल्याची दाट शक्यता आहे.
एकंदरीतच खान्देशातील चार मतदारसंघांपैकी नंदुरबार लोकसभा मतदारसंघ वगळला तर भाजपच्या बाजूने मतदारांचा कौल असल्याचे दिसून आला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर तेथील राजकीय परिस्थिती आणि जनमताच्या आधारावर हा रिपोर्ट मांडण्यात आलाय.
हेही वाचा : जळगाव, रावेर, नंदूरबारमध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस, खान्देशात नेमकी काय आहे परिस्थिती?