दरेगाव (सातारा) – विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री अद्यापही ठरल्या नाहीये. त्यात दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सत्तावाटपाच्या बैठकीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तडक साताऱ्याच्या मूळ गावी गेल्याने राज्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली. यातच मुख्यमंत्रीपद मिळत नसेल तर उपमुख्यमंत्रीपद डॉ. श्रीकांत शिंदे यांना देण्याची मागणी केली जात असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, या सर्व प्रश्नांवर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
डॉ. श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का?
डॉ. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांवर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, चर्चा अजून सुरू आहे. तुम्हीच आता खूप चर्चा करत असता. त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगतो, या सर्व चर्चा आहेत. आता एक बैठक आमची अमित भाईंबरोबर झाली आहे. दुसरी एक बैठक आमची तिघांची होईल आणि त्या बैठकीत खूप साधकबाधक चर्चा होईल आणि त्यातून महाराष्ट्राच्या हिताचा योग्य तो निर्णय होईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
View this post on Instagram
एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे –
- सत्तास्थापन करताना गावाला यायचं नाही, असा काय नियम आहे का, मी नेहमी गावी येतो.
- निवडणुकीत जनतेने भरभरुन प्रतिसाद दिला, जनतेच्या मनातील सरकार आता स्थापन होईल.
- महाविकास आघाडीने थांबवलेले प्रकल्प अडीच वर्षात गतिमानतेने पुढे नेले.
- आतापर्यंतच्या इतिहासात कधीही न झालेल्या कल्याणकारी योजनांचा निर्णय महायुतीच्या सरकारने अवघ्या सव्वा दोन वर्षात घेतला.
- या योजनेच्या महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जातील.
- मी शेतकरी कुटुंबातून येतो, म्हणून मी गावी येतो. गावी आल्यावर एक वेगळा आनंद मिळतो. माझ्या लोकांमध्ये येतो. माझी लोकं भेटतात. मला याठिकाणी समाधान मिळतो. मला गरिबीची जाणीव आहे.
- लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ या सर्वांसाठी काम केल्यावर आपलं सरकार लाडकं सरकार लोक म्हणू लागले.
- आतापर्यंतच्या इतिहासात महायुतीला जे यश मिळालं, ते कधीच मिळालं नव्हतं.
- मी जे काम केलं, जनतेचा मुख्यमंत्री, कॉमन मॅन म्हणून जे काम केलं, मी म्हणायचो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन. कॉमन मॅन म्हणून त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकांची भावना साहजिक.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेतील, त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे.
- खातेवाटपाबाबत चर्चा होईल. त्यातून बऱ्याचशा काही गोष्टी निघतील.
- आम्हाला ज्या लोकांनी निवडून दिले आहे, लोकांना जे काही आम्ही वचन दिले आहे, ती बांधिलकी आम्हाला जोपासायची आहे.
- आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत. विरोधकांना काही काम राहिलंय का?
- आमच्यामध्ये कुठलाही समन्वयाचा अभाव नाही. मी आधीच पत्रकार परिषदेत माझी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
- जेव्हा तुम्ही जिंकले, तेव्हा ईव्हीएम चांगले. जेव्हा तुम्ही हरले, तेव्हा ईव्हीएम खराब. विरोधकांना टोला.
हेही वाचा – Special Report : नव्या मुख्यमंत्र्यांचा मुंबईतील आझाद मैदानावर होणार शपथविधी, आजपासून पुढची प्रक्रिया कशी?