मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे उद्या शपथ घेणार आहे. मात्र, महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे सहभागी होतात का, त्यांना कोणते मंत्रीपद मिळते, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. यातच आज राजपालांकडे सत्तास्थापनेच्या दाव्यानंतर माध्यमांच्या प्रश्नानंतर उत्तर देताना एकच अजितदादांनी आणि एकनाथ शिंदेंनी केलेल्या बॅटिंगने सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी एकच हशा पिकला. या सर्व प्रकाराने फडणवीसांनाही हसू आवरेनासे झाले होते.
पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मला खूप आनंद आहे. अडीच वर्षात आमच्या महायुतीच्या सरकारने, आम्ही तिघांनी आणि आमच्या टीमने जे काम केले, ते उल्लेखनीय आहे. इतके मोठे निर्णय घेतले की, इतिहासात त्याची सुवर्णाक्षरांनी नोंद केली जाईल. याचा आनंद आहे.
पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं –
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर मग तुम्ही आणि अजितदादा पवार हेसुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का? असा प्रश्न पत्रकारांनी एकनाथ शिंदेंना विचारला. तर पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘अरे भाऊ आताच तर सांगितलं. देवेंद्रजींनीही सांगितलं. मीपण सांगितलं. थोडं थांबा. आता सायंकाळपर्यंत थांबा. उद्या शपथविधी आहे’. त्यातच अजित पवार म्हणाले की, ‘सायंकाळपर्यंत त्यांचं माहिती होईल. मी तर घेणारच आहे’. अजित पवार असे म्हटल्यावर एकच हशा पिकला.
त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘दादांना अनुभव आहे, संध्याकाळीही घ्यायची आणि सकाळीही घ्यायची’.
त्यानंतर अजित पवार म्हणाले, ‘सकाळी दोघांनी घेतली होती. ते राहून गेलेलं होतं. आता पुढं 5 वर्षे आणखी काही ठेवणार नाही’.
देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उद्या घेणार शपथ