जळगाव – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदी कोण बसणार याबाबत संपूर्ण देशात उत्सुकता आहे. मात्र, त्यातच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि जळगाव ग्रामीणचे आमदार हे राज्याचे पुढचे उपमुख्यमंत्री असतील, असे बॅनर जळगावमध्ये झळकले यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण आले. याविषयावर नेमकं खरं काय आहे, याबाबत गुलाबराव पाटील यांनीच स्वत: स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील –
गुलाबराव पाटील यांचा भावी उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेले बॅनर जळगाव ग्रामीण मतदार संघात झळकल्यामुळे याची चर्चा अधिकच तीव्र झाली. याविषयावर बोलताना जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कार्यकर्ते उत्साही असतात. पण तसा काही विषय नाही. आमचा नेता एकच आहे आणि त्यांचं नाव एकनाथरावजी शिंदे आहे. ते आदेश करतात त्यापद्धतीने आम्ही काम करत असतो आणि पुढच्या काळातही तशाच पद्धतीने काम करत राहू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
शिंदे साहेबांबाबत जनतेची भावना साहजिक –
सर्वसमावेशक कामे शिंदे साहेबांनी केल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री व्हावे, ही जनतेची भावना साहजिक आहे. पण माझा याध्ये कुठलाच अडचणीचा विषय नाही. मोदी-शहा साहेबांना माझी अडचण होईल, अशा पद्धतीचे मी कोणतेही वक्तव्य करणार नाही. ते जे निर्णय घेतील ते मला मान्य असेल, असे सांगत त्यांनी स्वत:च या मुद्द्याला खोडून काढले आहे, अशी माहितीही गुलाबराव पाटील यांनी दिली.
महायुतीच्या सरकारने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यास किमान उपमुख्यमंत्री व्हावे, अशी काही आमदारांची मागणी आहे. पण एकनाथ शिंदे जर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नसतील तर दीपक केसरकर, दादा भुसे, भरत गोगावले, शंभुराज देसाई, उदय सामंत या नेत्यांची नावे पर्याय म्हणून पुढे आली. यातच जळगाव जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ नेते गुलाबराव पाटील यांना उपमुख्यमंत्री पदाची लॉटरी लागू शकते, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, या चर्चांना आता स्वत: गुलाबराव पाटील यांनीच पूर्णविराम दिला आहे.