नाशिक, 10 जुलै : मुंबई आणि नागपुरनंतर नाशिकमधून हिट अँड रनची घटना समोर आली आहे. नाशिक शहरात काल मंगळवारी सायंकाळी बारदान फाटा परिसरात भरधाव कारच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. अर्चना किशोर शिंदे (वय 31, रा. हनुमाननगर, मोतीवाला कॉलेजसमोर) असे मृत महिलेचे नाव आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता साधना मिसळसमोरील रस्त्यावर अर्चना शिंदे या रस्त्याच्या बाजून पायी जात असताना मागून येणाऱ्या भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तीव्र रक्तस्राव झाला असता रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
View this post on Instagram
अपघाताचा व्हिडिओ समोर –
नाशिकमधील हिट अँड रनच्या जीवघेणा अपघाताचा सीसीटीव्हीत चित्रीत झाला आहे. संशयित चालवीत असलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारने (एमएच ०3, बीई 6634) पायी जाणाऱ्या अर्चना शिंदे यांना जोरदार धडक दिल्याचे या व्हिडिओतून दिसते.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारचालक फरार होण्याच्या बेतात असतानाच वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही तपासून पथकाने कार क्रमांकावरून संशयिताचा माग काढत त्याला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
राज्यात हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ –
मुंबईतील वरळी भागात एका भरधाव वेगाने असलेल्या एका कारने दुचाकीला धडक दिली. यानंतर महिलेवर गाडी चालवून तिला फरफटत नेण्यात आले. यात त्या महिलेचा मृत्यू झाला. तसेच राज्याच्या उपराजधानीतून म्हणजे नागपुरातून वेगवेगळ्या भागांत हिट अँड रनच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या होत्या. त्यात दोघांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा : Special Interview : 7 हजार 200 कोटींचा प्रकल्प; जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांना होणार मोठा फायदा