सातारा, 24 फेब्रुवारी : राज्यात आर्थिक क्षेत्रातील फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ असताना साताऱ्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. कामगारांच्या कष्टाची गुंतवणूक म्हणजेच पीएफ आणि एसआयची तब्बल 15 लाखांची रक्कम प्रेयसीच्या बँक खात्यावर पाठवल्याचे प्रकरण समोर आले आहे.
काय आहे प्रकरण? –
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा शहराजवळील धनगरवाडी कोडोली येथील एका कंपनीच्या पर्यवेक्षकाने कामगारांची पीएफ (कर्मचारी भविष्य निधी) आणि एसआयची 15 लाख रूपयांची रक्कम प्रेयसीच्या बँक खात्यावर पाठवून कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पर्यवेक्षकाला अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपी पर्यवेक्षकाला पोलिस कोठडी सुनावली आहे. सोमनाथ रामचंद्र किर्दत (रा.चिंचणेर निंब, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कंपनी पर्यवेक्षक मंगेश रमेश दुदकर (रा. संगमनगर, सातारा) आणि त्याच्या प्रेयसीविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद झालेला आहे.
कर्मचाऱ्यांच्या पीएफ (कर्मचारी भविष्य निधी) आणि एसआयची रक्कम प्रेयसीच्या खात्यावर पाठवल्याच्या फसवणूकीचा प्रकार दि. 2 नोव्हेंबर 2022 पासून 14 जानेवारी 2024 पर्यंत घडला असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 15 लाखांची ही रक्कम कामगारांच्या खात्यावर ऑनलाइन पाठविल्याच्या खोट्या पावत्याही केल्या होत्या.
हेही वाचा : World Youth Festival 2024 : चंद्रपुरचा संकेत गव्हाळे करणार रशियात भारताचं प्रतिनिधित्व