जळगाव, 5 फेब्रुवारी : जळगावातील मराठा स्पोर्टस् फाऊंडेशनच्यावतीने अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या हस्ते ‘स्वप्नांचा जीवनप्रवास’ या पुस्तकाचा युवा लेखक ऋषीकेश पाटील याचा त्याच्या वडिलांसह सन्मानचिन्ह भेट देत गौरव करण्यात आला. जळगावातील सागरपार्क मैदानात हा कार्यक्रम पार पडला.
मराठा प्रिमिअर लीगमध्ये सन्मान –
जळगावातील मराठा स्पोर्टस् फाऊंडेशनच्यावतीने मराठा प्रिमिअर लीगचे सागर पार्क येथे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या क्रिकेट स्पर्धेत मराठा मराठा समाजातून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक मान्यवरांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये धरणगाव तालुक्यातील पथराड येथील युवा लेखक ऋषीकेश पाटील याचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी पाटील बायोटेकचे प्रमोद पाटील, विजय देसाई यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते.
स्वप्नांचा जीवनप्रवास पुस्तकाचे लिखाण –
ऋषीकेश पाटील याने छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरणेने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी पुस्तक लिखाणाचे ध्येय हाती घेत ते पुर्ण केले. या पार्श्वभूमीवर त्याचा मराठा समाज बांधवांकडून गौरव करण्यात आला. यावेळी ऋषीकेश पाटील याच्यासोबत त्याच्या कुटुंबियांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. दरम्यान, या कार्यक्रमात त्याच्या वडीलांनी उपस्थित राहत ऋषीकेशसोबत सन्मानचिन्ह स्वीकारले.
ऋषीकेश पाटील याची प्रतिक्रिया –
युवा लेखक ऋषीकेश पाटील याने त्याच्या सन्मानाबद्दल सुवर्ण खान्देश लाईव्हच्या प्रतिनिधींसोबत बोलताना आनंद व्यक्त केला. तो म्हणाला की, माझ्यासाठी हा अभूतपूर्व क्षण होता. वडीलांच्या चेहऱ्यावरील आनंद यातच माझे सुख आहे..मराठा समाजातील या प्रतिष्ठित सन्मानासाठी मला आमंत्रित केले, त्याबद्दल मी सकल मराठा समाजाचे आभारी आहे.
ऋषीकेश पाटील याने त्याच्या पुस्तकाबद्दल सांगितले की, स्पर्धेच्या युगात तरूणांसमोर असंख्य अशी आव्हाने आहेत. स्वप्नप्राप्तीसाठी तरूणांना खूप कष्ट करावे लागतात. तसेच तरूणाईला स्वप्नपूर्तीच्या प्रवासात अपयशामुळे नैराश्याचा देखील सामना करावा लागतो. अशावेळी तरूणांच्या स्वप्नांच्यापूर्ततेसाठी दिशादर्शक ठरेल असे ‘स्वप्नांचा जीवनप्रवास’ पुस्तक आहे. युवकांसाठी प्रेरक ठरावे अशा हेतुने सोप्या आणि साध्या भाषेत या पुस्तकाची रचना केली असल्याचेही त्याने सांगितले.
हेही वाचा : Jalgaon SP : जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकपदाचा एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी स्वीकारला पदभार