चाळीसगाव, 29 डिसेंबर : खान्देश ही वीरांची भूमी आहे, हे या खान्दशने अनेकवेळा सिद्ध करुन दाखविले आहे. या वीरतेचे आणखी एक उत्कृष्ट उदाहरण समोर आले आहे. चाळीसगाव तालुक्यातील एक वीर जवानाला भारतीय सैन्यदलात सेवा बजावत असताना 26 नोव्हेंबर 2020 रोजी श्रीनगर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आले होते. यानंतर आता या वीरजवानाचा लहान भाऊसुद्धा भारतीय सैन्यदलात भरती झाला आहे.
पंकज देशमुख असे सैन्यदलात भरती झालेल्या या तरुणाचे नाव आहे. पंकजचे मोठे भाऊ चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगावाचे सुपुत्र यश देशमुख यांना 26 नोव्हेंबर 2020 रोजी श्रीनगर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आले होते. यानंतर त्यांच्या आईवडिलांनी देशसेवेप्रती असलेल्या प्रेमामुळे लहान मुलालासुद्धा सैन्यदलात पाठवण्याचा निर्णय घेतला.
मोठ्या मुलाला वीरमरण आल्यानंतर…
चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव या गावातील रहिवासी असलेले दिगंबर देशमुख हे शेती करतात. त्यांना दोन मुले व पत्नी असा त्यांचा परिवार होता. दरम्यान, त्यांचा मोठा मुलगा मुलगा यश हा सैन्य दलात भरती झाला. मात्र, 26 नोव्हेंबर 2020 रोजी श्रीनगर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात यशला वीरमरण आले. यानंतर मोठा मुलगा सैन्यदलात शहीद झाल्यानंतर साहजिकच दुसऱ्या मुलाला कुणी सैन्यदलात पाठविण्याचा विचार करणार, असं कुणाला वाटू शकत नाही. मात्र, आपला मोठा मुलगा सैन्यदलात शहीद झाल्यानंतर देशमुख कुटुंबीयांनी लहान मुलगा पंकज याला सैन्यदलात पाठविण्याचा निर्णय घेतला.
इंजिनिअरिंगचे शिक्षण, नोकरीच्या संधी आल्या तरी…
पंकज देशमुख या तरुणाने मेकॅनिकल इंजिनीयरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्याला शिक्षणानंतर काही ठिकाणांहून चांगल्या पगाराच्या नोकरीच्या ऑफर्स आल्या होत्या. मात्र, त्यानेही आपल्या मोठ्या भावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत देशसेवेसाठी सैन्यदलाचा खडतर मार्ग निवडला. यश देशमुख यांचे प्रशिक्षण ज्याठिकाणी झाले होते, त्याचठिकाणी पंकज देशमुख या तरुणाचे सैन्यदलाचे प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे. प्रशिक्षणासाठी पंकज हा बेळगावला रवानाही झाला आहे.
हेही वाचा – चाळीसगाव तालुक्यात 22 वर्षांची तरुणी झाली सरपंच, विजयानंतर म्हणाली….
त्यांची आई सुरेखा देशमुख या मातेने आपला मोठा मुलगा सैन्यदलात शहीद झाल्यानंतर लहान मुलालाही भारत मातेच्या सेवेसाठी सैन्यदलात पाठवायला संमती दिली. सैन्यदलात जितकी मुले आहेत, ती सर्व माझी मुले आहेत, या शब्दात त्यांनी आपला मुलगा पंकजला सैन्यदलात जाण्यासाठी, देशसेवेसाठी बळ दिले. देशमुख कुटुंबीयांना सुवर्ण खान्देशचा मनापासून सलाम.