ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 28 ऑगस्ट : पाचोरा शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या दहीहंडीत 32 वर्षीय गोविंदा पडल्याने जखमी झाला. उपचारादरम्यान त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून त्याचा मृत्यू झालाय. नितीन पांडुरंग चौधरी (वय, 32) असे मयत तरूणाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत केली जात असून मयत गोविंदाच्या परीवाराला आर्थिक मदतीची मागणी पाचोरा काँग्रेसने केली आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील रिक्षा स्टॉपसह स्टेशन रोड परीसरातील युवकांनी दहीहंडीचे आयोजन केले होते. यावेळी गोविंदा पथकातील नितीन पांडुरंग चौधरी हा 32 वर्षीय युवक दहीहंडी फोडतांना खाली पडला त्यास रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, रूग्णालयात उपचार सुरू असताना आज 28 ऑगस्ट रोजी नितीनची प्राणज्योत मालवली. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांनी शवविच्छेदन केले.
तरूणाच्या मृत्यूने शहरात हळहळ –
शोकाकुल वातावरणात आज नितीन चौधरीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई वडील आणि दोन भाऊ आहेत. दरम्यान, नितीन हा रिक्षा चालक होता तसेच घरातील कर्ता पुरुष होता. हसतमुख असणारा आणि नेहमी सामाजिक कार्यात सहभागी होणारा म्हणून त्याची ओळख होती. अशातच त्याचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत केली जात आहे.
परिवाराला आर्थिक मदतीची काँग्रेसने केली मागणी –
नितीनच्या निधनाचे वृत्त मिळताच काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. यावेळी मयत गोविंदा नितीन चौधरी यांच्या परिवाराला शासनाने मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
हेही वाचा : जळगावात कुंटणखान्यावर एमआयडीसी पोलिसांचा छापा, 5 पीडित महिलांची सुटका, काय आहे संपुर्ण बातमी?