चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 19 मे : देशातील लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक असो राजकीय नेत्यांना एकाच वेळी दोन मतदारासंघातून निवडणूक लढवण्याची मुभा असते. मात्र, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून आणि कोणत्याही एकाच घटकात सहभागी होता येणार आहे.
काय आहे नवा नियम? –
प्रशिक्षण व खास पथके विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीणकुमार पडवळ यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून आणि कोणत्याही एकाच घटकात सहभागी होता येणार आहे. एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांत अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणताही एक जिल्हा निवडणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र सादर करण्याचे आदेश देखील या परिपत्रकात देण्यात आले होते. 17 मे पर्यंत यासाठी मुदत देण्यात आली होती.
नव्या निर्णयावरून तरूणांमध्ये नाराजी –
1951 च्या लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार, एक व्यक्ती एकाच वेळी जास्तीत जास्त दोन ठिकाणी लोकसभा वा विधानसभा निवडणूक लढवू शकते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 23 जण असे निघाले, ज्यांनी दोन ठिकाणी निवडणूक लढवली. असे असताना गृहविभागाने पोलीस भरती करणाऱ्या उमदेवारांसाठी घेतलेल्या निर्णयावरून तरूणांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय नेत्यांना मुभा अन् तरूणांना सजा का?, असा प्रश्न देखील तरूणांकडून उपस्थित केला जात आहे.
“उमेदवारांचे वाढत्या वय तसेच त्यांना मिळणाऱ्या संधी याकडे बघितले असता आमची या निर्णयाला नाराजी आहे. एका उमेदवाराने एकापेक्षा अधिक जिल्ह्यात अर्ज केला असता त्यांना त्याठिकाणी संधी देण्यात यावी.”
– गिरीश बडगुजर
उमेदवार, पोलीस भरती
पोलीस भरती 2024 –
राज्यात सुमारे 17 हजार 471 पदांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी तब्बल 17 लाख 76 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यामध्ये पोलीस भरतीसाठी डॉक्टर, इंजिनिअर, एमबीए, वकील, एमएस्सी, बी-टेक, बीबीएचे शिक्षण घेतलेले उच्चशिक्षितांनी देखील अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : किराणादुकान चालकाच्या मुलीने मिळवली मंत्रालयात सरकारी नोकरी; वाचा, अमरावतीच्या पल्लवीची प्रेरणादायी कहाणी