जामनेर, 12 ऑगस्ट : जामनेर तालुक्यातून तरूणाची हत्या झाल्याची बातमी समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरूणाला संशयावरून काही तरूणांनी बेदम मारहाण केली. दरम्यान, मारहाणीनंतर तरूण घरी आला असता त्याचा मृत्यू झाला. सुलेमान रहिमखान पठाण (वय 21 रा. बेटावद खु.) असे मयत तरूणाचे नाव आहे.
याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणातील आठ ते दहा जणांची ओळख निश्चित करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, तरूणाच्या हत्येमुळे काल सायंकाळी जामनेर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याने तणाव कमी झाला.
View this post on Instagram
जळगावचे एसपी काय म्हणाले? –
तरूणाचा मारहाणीत मृत्यू झाल्यप्रकरणी जामनेरात तणाव निर्माण झाला होता. याची तात्काळ दखल घेत जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी जामनेरात दाखल झाले. यानंतर घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच मारहाण प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी एसपींनी पोलिस प्रशासनास सूचना दिल्या. यानंतर त्यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले की, जामनेर शहरात एका कॅफेमध्ये एका मुलासोबत काही तरूणाचा वाद झाला. या वादानंतर त्या तरूणाला मारहाण करण्यात आली. पुन्हा त्याला बसस्थानकापर्यंत आणत मारहाणी केली. याचवेळी संबंधित तरूणाचे आई-वडिल घटनास्थळावर पोहचले. यावेळी त्यांनी जखमी तरूणाला रूग्णालयात दाखल केले. मात्र, रूग्णालयात त्या तरूणाला मृत घोषित करण्यात आले.
एसपींनी नेमले तपासासाठी चार पथके –
जामनेरातील मारहाणीत तरूणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून आतापर्यंत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. यासोबत आठ जणांचे नाव निश्चित करण्यात आले असून त्यांना देखील लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह इतर पोलिस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांची चार पथके तयार करण्यात आल्याचेही एसपींनी सांगितले. दरम्यान, तरूणाच्या हत्येप्रकरणी जामेरात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आंदोलनकर्त्यांना समज देत यावेळी कारवाईचे आश्वासन दिले.
View this post on Instagram
नागरिकांना एसपींनी केले महत्वाचे आवाहन –
डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पुढे बोलताना सांगितले की, सदर घटनेचा तपास पोलीस करत असून कुठल्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये. पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास करत आहेत. तसेच सध्यास्थितीत जामनेरात परिस्थिती नियंत्रणात असून नागरिक देखील आम्हाला सहकार्य करत आहेत. दरम्यान, नागरिकांनी कुठलाहा कायदा व सुव्यवस्था हातात घेण्याचे काम करू नये, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही एसपींनी दिलाय.