जळगाव, 16 सप्टेंबर 2025 : राज्य शासनाच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील एकूण 1160 ग्रामपंचायती सहभागी होणार आहेत. दरम्यान, आज 17 सप्टेंबर बुधवार पासून या अभियानाला सुरुवात होणार आहे.
आजपासून अभियानास सुरूवात –
जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायात पातळीवर आज बुधवार दि. 17 रोजी एकाच वेळी ग्रामसभा घेण्यात येणार आहे. अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, या उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग नोंदविणाऱ्या ग्रामपंचायतींना बहुस्तरीय बक्षिसे देण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ बुधवार दि. 17 सप्टेंबर रोजी करण्यात येणार असून, त्याआधी या अभियानाच्या प्रचार-प्रसारासाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टरचे उद्घाटन मंगळवार दि. 16 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या इमारतीत करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे उपस्थित होते.
सीईओ मिनल करनवाल यांचा खास संदेश –
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याबाबत जि.प. सीईओ मिनल करनवाल यांनी जळगाव जिल्हावासियांना संदेश देताना सांगितले की, कुठलेही राज्य अथवा देश विकसित होण्यात लोकसहभाग हा घटक महत्वाचा राहिला आहे. यामुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या रूपाने जळगावकरांना आपल्या भागाला विकसित करण्याची खूप मोठी संधी प्राप्त झाली आहे.
अभियानाच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी लोकसहभाग महत्वाचा –
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आपल्या गावात लोकसहभागातून कुठलाही कार्यक्रम राबवायचा असेल अन् गावकऱ्याची इच्छा असेल मी स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं तर त्यांनी माझ्याशी संपर्क केल्यास मी तसेच जि.प.चे विभागप्रमुख स्वतः त्या कार्यक्रमास उपस्थित राहतील. यामुळे या अभियानाच्या प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी लोकसहभाग देखील तितकाच महत्वाचा असल्याचे सीईओ मिनल करनवाल यांनी सांगितले.
‘माझं गाव, माझा उपक्रम आणि माझा पुरस्कार’ –
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आठ उद्दिष्ट्ये हाती घेण्यात आले असून गावाचा सर्वांगीण विकास आणि खऱ्या अर्थाने गावाला समृद्ध करण्याचे काम करण्यात येणार आहे. ग्रामविकास कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाण्यासाठी जळगाव जिल्हा परिषद प्रशासन सदैव नागिरकांसोबत आहे. मात्र, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागातून सर्वांनी एकत्र येऊन माझं गाव, माझा उपक्रम आणि माझा पुरस्कार असा विचार हाती घेतला तर जळगाव जिल्हा परिषदेला या अभियानात सर्वाधिक पुरस्कार मिळतील, असा विश्वास सीईओ मिनल करनवाल यांनी व्यक्त केला.