जळगाव, 18 एप्रिल : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2023 ला घेण्यात आलेल्या 1143 जागांसाठीच्या परीक्षांचे अंतिम निकाल आज जाहीर झाले असून यात दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबलच्या विविध वर्गांमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या 9 विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाची पताका फडकावली आहे. विशेष म्हणजे या नऊपैकी पाच विद्यार्थी दिव्यांग आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये फरहान जमादार, कोल्हापूर (AIR 191), आयुष अग्रवाल, मथुरा, उत्तर प्रदेश ( AIR 341), प्रविणसिंग चरण, अजमेर, राजस्थान (AIR 532 ), प्रियांका मोहिते, येवला (AIR 595), सुरेश बोरकर, नागपूर (AIR 658 ), प्रितेश बाविस्कर, कासोदा, जळगाव (AIR 767 ), पार्थ चावडा, जुनागड (AIR 932 ), श्रवण देशमुख, सातारा (AIR 976), भानू शर्मा, कल्याण ( AIR 1014) यांचा समावेश आहे.
दीपस्तंभ मनोबलमध्ये दिव्यांगांसाठी दिल्या जाणाऱ्या विशेष प्रशिक्षणाचा खूप फायदा झाला. यजुर्वेंद्र महाजन सर आणि इतर सर्व अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आत्मविश्वास वाढला. भविष्यात मी सुद्धा मनोबल करीत असलेल्या कामात माझे योगदान देईल, अश्या भावना या प्रसंगी फरहान जमादारने व्यक्त केल्या.
समाजातील सर्वच स्तरातील घटकांमधून कर्तव्यदक्ष, सवेंदनशील आणि प्रामाणिक अधिकारी घडावे यासाठी संस्था 18 वर्षांपासून कार्यरत आहे. याही वर्षी विदयार्थ्यांना उत्तम यश मिळाले आहे, त्याचा आनंद वाटतो. प्रज्ञाचक्षू आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे दिव्यांग व वंचित घटकातील विदयार्थ्यांसाठी विशेष प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण कष्ट आणि संस्थेतील अनेक जेष्ठ प्रशासकीय अधिकारी, मार्गदर्शक व देणगीदार यांच्या मुळे हे यश प्राप्त झाले आहे अश्या भावना दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी यावेळी व्यक्त केल्या.
या विद्यार्थ्यांना राजेश पाटील( आय.ए.एस ), वैभव निंबाळकर (आय.पी.एस), मयूर सूर्यवंशी (आय.पी.एस), धीरज मोरे (आय.आर.एस), यजूर्वेंद्र महाजन, विभाग प्रमुख मिलिंद उषा रामकृष्ण यांच्या सोबत अकरा अधिकाऱ्यांच्या टिमने मार्गदर्शन केले.
हेही वाचा : ना मुंबई, ना पुणे, ना कोणता क्लास, तरी त्यानं करुन दाखवलं, पिंपळगावचा विशाल बनला PSI