मुंबई, 13 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची काल रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दरम्यान, त्यांच्यावर आज कूपर रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तसेच आज सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव हे अंतिम दर्शनसाठी ठेवण्यात आले होते. यानंतर मुंबईतील मरीन लाईन्सवरील बडा कब्रस्तानमध्ये बाबा सिद्दकी यांचा दफनविधी पार पडला आहे.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार –
बाबा सिद्दीकी हे राज्याचे माजी मंत्री होते. असे असताना बाबा सिद्दीकी यांच्यावर प्रोटोकॉलनुसार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. दरम्यान, आज रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव दाखल झाल्यानंतर त्यांना मानवंदना देण्यात आली आहे. यानंतर बाबा सिद्दकी यांचा दफनविधी पार पडला आहे.
झिशान यांना अश्रू अनावर –
बाबा सिद्दिकींचे चिरंजीव आणि आमदार झिशान सिद्दिकी यांना वडिलांना अंतिम निरोप देताना अश्रू अनावर झाले. यावेळी बापाचं छत्र हरपल्याने झिशान यांनी टाहो फोडला. बाबा सिद्दीकी यांना अखेरचा निरोप देताना झिशान सिद्दीकी यांच्याबरोबरच अनेक जणांच्या डोळ्यात पाणी आले. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यसंस्कारावेळी मोठा पाऊस झाला. यावेळी पावसात भिजून बाबा सिद्दिकी यांना मानवंदना देण्यात आली.
लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली हत्येची जबाबदारी –
झिशान सिद्दिकींच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आतापर्यंत दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तिसऱ्या आरोपीची ओळख पटल्याची माहिती देखील समोर आली आहे. दरम्यान, या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे. हिंदी भाषेत मजकूर टाकून बिश्नोई गँगने ही हत्या आम्ही केली आहे, असे बाबा सिद्दिकी यांचे नाव घेऊन सांगितले आहे. दरम्यान, दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख कथीत पोस्टमध्ये केला आहे.