बुलडाणा, 27 जानेवारी : मागील 75 वर्षात ब्रिटनमध्ये शिकलेल्या भारतातील 75 माजी विद्यार्थी ज्यांनी वेगेवेगळ्या क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे. त्यांचा ब्रिटनमधील लंडनमध्ये सत्कार करण्यात आला. या अवार्डमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा, राज्यसभा सदस्य राघव चड्डा, सिरम इन्स्टिट्युटचे आदर पूनावाला इत्यादी प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. मात्र, याच पुरस्कारामध्ये एक महत्त्वाचं नाव म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरीपुत्र राजू केंद्रे. विदर्भातील शेतकरी कुटूंबातील राजू केंद्रे यांनाही लंडन मध्ये ब्रिटिश कॉन्सिलतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ब्रिटिश काऊन्सिल, ब्रिटिश सरकारच्या उच्च-शिक्षण विभाग आणि युके राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम नुकताच पार पडला.
शेतकरी पूत्र राजू केंद्रेंचा प्रवास –
राजू केंद्रे हे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील पिंप्री खंदारे या छोटयाश्या खेड्यातील भटक्या समाजातून येतात. राजु यांच्या आई वडिलांचे प्राथमिक शिक्षणही झालेले नाही. राजू यांच्या माध्यमातून कुटुंबातील पहिलीच पिढी उच्च शिक्षण घेणारी ठरली आहे. राजू यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात गेले पण आर्थिक आणि सामाजिक अडचणीमुळे अवघ्या काही महिन्यात राजू यांना पुणे सोडावं लागले.
त्यांच्या ह्या अनुभवातूनच त्यांना एकलव्य फाऊंडेशन सुरू करावे वाटले. याच दरम्यान, पुणे सोडल्यानंतर त्यांना महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथून पूर्ण करावं लागलं. यानतंर पुढे त्यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून ग्रामीण विकास विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
ब्रिटिश सरकारची प्रतिष्ठित चेव्हेनिंग स्कॉलरशिपशी मिळवली –
2021 मध्ये राजू यांना जगातील प्रतिष्ठित अशी ब्रिटिश सरकारची मानाची चेव्हेनिंग स्कॉलरशिप मिळवली. या स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्यांनी मागच्याच वर्षी SOAS, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथून एमएससी इन डेव्हलपमेंट स्टडीजचे शिक्षण पूर्ण केले. लंडन येथील शिक्षणादरम्यान, त्यांनी उच्च शिक्षण आणि असमानता या विषयावर संशोधन केले आहे. .राजू यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्वीडिश इन्स्टिट्यूट व जर्मन डेव्हलपमेंट इन्स्टिटयूट येथील फेलो म्हणून पण निवडले होते. इतकेच नव्हे तर मागच्या वर्षी प्रतिष्ठित अशा ‘फोर्ब्स’ मासिकाने सुद्धा त्यांना 30 प्रतिष्ठित युवकांच्या यादीत समावेश केलं होते.
पुरस्कार मिळाल्यावर राजू काय म्हणाले?
“जागतिक दर्जाच्या स्कॉलरशिपमध्ये वंचित घटकातील प्रतिनिधीत्व कमी असल्याचं मागच्या वर्षी लंडन मध्ये शिकत असताना असताना ‘ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रॅम’ सुरू केला आहे, त्यामाध्यमातून आम्ही प्रायोगिक पातळीवर शंभर विद्यार्थ्यांना वर्षभराची ट्रेनिंग देत आहोत. पुढच्या एका दशकात वंचित घटकातील किमान २००० जागतिक ग्लोबल स्कॉलर्स घडवण्याचं माझं ध्येय आहे, आजचा हा पुरस्कार ह्या निमित्ताने सर्व वंचित समुदायाला अर्पण करतो.”, असे ते म्हणाले.
राजू केंद्रे यांचे एकलव्य फाऊंडेशन काय काम करतंय –
ग्रामीण आदिवासी भागातील, वंचित घटकातील पहिल्या पिढीतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी त्यांचे “एकलव्य फाऊंडेशन” काम करत आहेत. एकलव्यच्या माध्यमातून त्यांनी आजवर 700हुन अधिक युवकांना उच्च शिक्षणासाठी संधी मिळवून दिली आहे. सोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात 20 हजारहुन अधिक विद्यार्थ्यांपर्यंत वेगवेगळ्या कार्यशाळांच्या उच्च शिक्षणाच्या संधी घेऊन गेले आहे. विशेतः गडचिरोली, मेळघाट यवतमाळ सारख्या दुर्गम भागात त्यांचे विशेष कार्य आहे.
नुकतेच कारगिलमध्ये पण एकलव्यने काम हाती घेतले आहे. ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रॅमच्या माध्यमातून जगभरातील स्कॉलरशिप, विद्यापीठामध्ये वंचित घटकातील विद्यार्थी पोहोचवण्यासाठी एकलव्यने दोन वर्षांपासून उपक्रम हाती घेतले आहेत. लंडन येथे झालेल्या त्यांना सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शेतकरीपूत्र राजू केंद्रे यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी सुवर्ण खान्देशच्या लाईव्ह कडून खूप शुभेच्छा!