ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 25 नोव्हेंबर : पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली सुर्यवंशी यांचा विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडून पराभव झाला. दरम्यान, वैशाली सुर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषदेत विधानसभेच्या निकालबाबत भाष्य केले. विधानसभा निवडणुकीचा निकाल हा जनमताचा विश्वासघात तर आहेच. पण ईव्हीमचा विजय झाला अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत आणि यात तिळमात्र शंका नसल्याचे वैशाली सुर्यवंशी म्हणाल्या.
काय म्हणाल्या वैशाली सुर्यवंशी? –
वैशाली सुर्यवंशी पत्रकार परिषदेत संवाद साधताना म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीचा जळगाव जिल्ह्याचा निकाल समोर आला आहे. महाराष्ट्रात देखील हा जो काही निकाल लागला आहे. त्यावरून लोकसभेचा निकाल आणि विधानभेचा निकाल यामध्ये तुलना केली तर विधानसभेचा निकाल हा न पटणारा आहे. लोकशाहीचा खून आहे की काय?, अशापद्धतीचा हा निकाल लागलेला आहे.
एकीकडे आपण बघतो या देशात शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, तरुणांच्या हाताला काम नाही…बेरोजगाराची मुद्दा आहे. आपल्या देशात महिला सुरक्षित नाहीत. महागाई गगनाला भिडलेली आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीचा एकही उमेदवार निवडून येत नाही. हे हास्यस्पद आहे. ज्यापद्धतीची मतांची आघाडी आहे…ते आपण स्वप्न बघतो की काय, अशापद्धतीचे राज्यासह देशाला हादरवणारे निकाल लागले आहे, असे मत निकालाबाबत वैशाली सुर्यंवंशी यांनी व्यक्त केले आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत असताना पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत ज्यापद्धतीचे लीड वाढत होते. ते तर संशयास्पद आहे. खरंतर, हा ईव्हीएमचा अतिरेक आहे. अशापद्धतीचे निकाल हे जनतेची फसवणूक असल्याचे वैशाली सुर्यवंशी यांनी सांगितले. दरम्यान, यापुढील निवडणुका बॅलेट पेपरवरच व्हायला पाहिजेत. आणि बॅलेट पेपरवरचे आव्हान प्रत्येकाने स्विकारले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. तसेच जनतेच्या सेवेसाठी कायमस्वरूपी कार्यरत राहणार असल्याचे वैशाली सुर्यवंशी यांनी यावेळी स्पष्ठ केले.
हेही वाचा : ‘आमचे आप्पा मंत्री व्हावेत,’ कुरंगी-बांबरूड गटातील शिवसैनिकांचे तुळजाभवानी मातेला साकडे