शिक्रापूर (पुणे) – गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच बलात्काराच्याही घटना समोर येत आहेत. पुण्यात कोयत्या गँगच्या धुमाकुळाचीही राज्यभरात चर्चा झाली होती. यातच आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावचे माजी उपसरपंच आणि कंत्राटदार विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना मागच्याच महिन्यात घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा दिवसाढवळ्या पुण्यात हत्येचा थरार पाहायला मिळाला आहे.
अज्ञात हल्लेखोराने माजी उपसरपंचावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची निघृण हत्या केली. दत्ता गिलबिले असे हल्ला झालेल्या माजी उपसरपंचाचे नाव आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूरच्या माजी उपसरपंचावर अज्ञात तरुणाने धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात दत्ता गिलबिले यांचा मृत्यू झाला आहे.
शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले हे आज रविवारी दुपारच्या वेळेस आपल्या बंगल्याच्या आवारात खुर्चीमध्ये बसलेले असताना आरोपींनी धारदार शास्त्राने त्यांच्या मानेवर वार केले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दत्ता गिलबिले यांना मृत घोषित केले.
दत्ता गिलबिले यांच्या मानेवर आणि पाठीवर गंभीर वार करण्यात आले होते. यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्ता गिलबिले यांची हत्या का करण्यात आली, याबाबतचे कारण अजून अस्पष्ट आहे. दरम्यान, या हत्येमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.