वॉशिंग्टन, 2 डिसेंबर : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या कश्यप उर्फ काश पटेल यांची फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच एफबीआय(FBI)च्या संचालकपदी नियुक्तीची घोषणा केली आहे. जानेवारी डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. तत्पुर्वी, काश पटेल यांची एफबीआय संचालकपदी नियुक्त करण्यात आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती –
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काश पटेल यांच्या नियुक्तीबाबत माहिती दिली की, मला हे घोषित करताना आनंद होतोय की कश्यप ‘काश’ पटेल हे एफबीआयचे पुढील संचालक असतील. काश हे एक उत्कृष्ट वकील असून उत्तम अन्वेषक देखील आहेत आणि ‘अमेरिका फर्स्ट’वर त्यांचा दृढ विश्वास राहिलाय. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक भ्रष्टाचार उघड करण्यासाठी, न्यायचे संरक्षण करण्यासाठी आणि अमेरिकन लोकांच्या सुरक्षेसाठी कामे केली आहेत. दरम्यान, काश यांनी माझ्या पहिल्या कार्यकाळात उत्कृष्ट काम केले असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटलंय.
काश पटेल यांचा अल्पपरिचय –
अमेरिकेने काश पटेल यांना एफबीआय संचालक बनवण्याचा निर्णय घेतला असून ते भारतीय वंशाचे आहेत. अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पटेल यांची नियुक्ती केली आहे. एफबीआय या तपास संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणारे ते पहिलेच भारतीय अमेरिकन व्यक्ती असणार आहेत. काश पटेल यांचे वय 44 असून त्यांचे मूळ नाव कश्यप पटेल असे आहे. तसेच ते अमेरिकेतील एक प्रसिद्ध वकील आहेत. दरम्यान, अयोध्येत ज्यावेळी राम मंदिराची निर्मिती केली होती त्यावेळी त्याचे समर्थन काश पटेल यांनी केले होते.