धुळे, 9 डिसेंबर : धुळे जिल्हा पोलीस मुख्यालयात कनिष्ठ श्रेणी महिला लिपिक पदावर कार्यरत असलेल्या लिपिक मनिषा देसले यांना विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी निलंबित केले आहे. धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक निरीक्षण तपासणी अहवालात पोलीस मुख्यालयाची रोजकीर्दी (डे-बुक) यात अपुरी नोंद आढळून आल्याने त्यांच्यावर कर्तव्यात कसूर व हलगर्जीपणाचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं काय प्रकरण? –
मिळालेल्या माहितीनुसार, मनिषा देसले ह्या धुळे जिल्हा पोलीस मुख्यालयात कनिष्ठ श्रेणी महिला लिपिक पदावर कार्यरत होत्या. असे असताना नाशिक परिक्षेत्रातील जिल्हा पोलीस दलाचे सन 2024-25 चे वार्षिक निरीक्षक तपासणी आयजी यांच्या पथकाककडून सुरू आहे. या तपासणीत मनिषा देसले यांच्याकडील रोजकिर्दीत 19 ऑक्टोबर 2024 पर्यंतचीच नोंद आढळून आली. याशिवाय जमाखर्च नस्तीही पाहण्यासाठी उपलब्ध करून दिल्या नाहीत. या कारणामुळे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी देसले यांच्या निलंबनाचे आदेश काढले.
चौकशीचे दिले आदेश –
तसेच त्यांचा पुढील तीन वर्षांचा वाढीव भत्ता रोखून प्राथमिक चौकशीचे आदेश संबंधित पोलीस यंत्रणेला दिले आहेत. याशिवाय प्राथमिक चौकशी धुळे शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वर्षा पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. देसले यांना निलंबन कालवधीमध्ये गृहविभागाचे पोलीस उपअधीक्षक यांचे पूर्व परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याची अटही टाकण्यात आली आहे.
हेही वाचा : Video : अक्कलकुव्याचे आमदार आमश्या पाडवी शपथेवेळी गोंधळले, नेमकं काय घडलं, पाहा व्हिडिओ…