धुळे, 26 जानेवारी : देशात सर्वत्र प्रजासत्ताक दिन साजरा केला जात असताना धुळे जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. धुळ्यातून गोवंशांची अवैध वाहतूक सुरूच असून आम्ही या गाड्या अडवण्यासाठी गेलो असता आमच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्या जात असल्याने गोरक्षकाने आत्महदहनाचा प्रयत्न केला आहे. असे या गोरक्षकाचे नाव आहे.
गोरक्षकाचा प्रजासत्ताकदिनी आत्मदहनाचा प्रयत्न –
धुळ्यात प्रजासत्ताक दिनी शिरपूर येथील गोरक्षक असलेल्या वावड्या पाटील नामक गोरक्षकाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन सोहळा सुरू असताना हा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, पोलिसांनी गोरक्षकाला वेळीच ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे धुळ्यात एकच खळबळ उडाली आहे. गोरक्षकाचे पोलिस निरीक्षकांवर गंभीर आरोप –
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर शहरातून अवैधरित्या होणारी गोवंशाची वाहतूक पोलीस निरीक्षक के. के. पाटील हे थांबवत नसून आम्ही या गाड्या अडवण्यासाठी गेलो असता आमच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याचा आरोप वावड्या पाटील या गोरक्षकाने केला आहे. दरम्यान, के. के. पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी वावड्या पाटील यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच गोरक्षक वावड्या पाटीलला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
बीडमध्ये मंत्री दत्ता भरणे यांच्यासमोर आत्महदहनाचा प्रयत्न –
बीडमध्ये देखील ऐन प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी युवकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. मंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते बीडमध्ये शासकीय ध्वजरोहण करण्यात आले. दरम्यान, हा कार्यक्रम आटोपल्यानंतर मंत्री भरणे यांचा ताफा हा शासकीय विश्रामगृहाकडे जात असताना नितीन मुजमुले या युवकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. बीडच्या नगरपालिकेतील घोटाळ्याची चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकारी नीता अंधारे यांना बडतर्फ करा, अशी मागणी या युवकाने केली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे प्रशासनाचा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी नितीन मुजमुले याला ताब्यात घेतले असता तेव्हा त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याचे समोर आले.