जालना, 9 फेब्रुवारी : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना मोठी बातमी समोर आली आहे. जालना पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह 9 वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केलीय. यामध्ये जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील पाच जणांचा समावेश आहे. यावरून जरांगे चांगलेच संतापले असून त्यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलाय.
मनोज जरांगे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा –
मुख्यमंत्री तसेच सुरेश धस यांनी एकीकडे सांगायचं की, आम्ही गुन्हे मागे घेणार आहोत असे तर दुसरीकडे नोटीस पाठवायच्या. एकीकडे म्हणायचे गुन्हा मागे घेतो आणि दुसरीकडे गुन्हे वाढवायचेत खरंतर, तुम्ही अंतरवालीतील मराठा आंदोलकांना नोटीसा देणार असाल आणि त्यांच्या पाठीमागे असे लागणार असाल तर मी सोडणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगेंनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. प्रामाणिकपणे आंदोलन करणाऱ्याला तुम्ही विकत घेऊ शकत नाहीत, असेही जरांगे म्हणाले आहेत.मनोज जरांगे पुढे म्हणाले की, मराठा आंदोलन म्हणून तुम्ही जर नोटीस देणार असाल तर अंतरवालीच नाही तर राज्यात कोणीही हे सहन करणार नाही. मला बदनाम करण्यासाठी एखाद्या वेळेस पाहुणे-रावळे घेतले असतील त्यांनी माझी बोलती बंद करण्यासाठी हे षडयंत्र असू शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ धनंजय मुंडेंसारखी टोळी आहे. दरम्यान, एखादा मुद्दा मी उचलू नये म्हणून पाहुणेरावळे काढले आहेत. पण मला कोणी पाहुणा नाही, मराठा समाजासाठी मी आई-वडील सुद्धा घरी ठेवले आहेत. मी फक्त मराठा आंदोलक आहे, असे मनोज जरांगे म्हणालेत.
15 फेब्रुवारीपासून बेमुदत साखळी उपोषण –
मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांची अंमलबजावणी न केल्याने मनोज जरांगेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय. येत्या 15 फेब्रुवारीपासून राज्यभरात मराठा समाजाचे बेमुदत साखळी उपोषण सुरू होणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी याबाबतची घोषणा केलीय. दरम्यान, मुंबईतही जाऊन आंदोलन करणार असल्याचा इशाराही जरांगेंनी दिलाय. दोन तीन दिवसात मुंबईतल्या आझाद मैदानाची पाहणी करणार असल्याचेही मनोज जरांगे यांनी म्हटलंय.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत