शिर्डी : येत्या 22 आणि 23 मार्च रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीत 13 व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संत साहित्य संमेलनाला महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यातील वारकरी बांधव उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती अखिल भारतीय मराठी संत साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली.
असे असणार आयोजन –
येत्या 22 आणि 23 मार्च रोजी शिर्डीत संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 22 मार्च रोजी संपूर्ण शिर्डी शहरातून पारंपरिक वेशभूषेत दिंडी काढण्यात येणार आहे. दिंडी कार्यक्रमास्थळी दाखल झाल्यानंतर परिषेदेला सुरूवात होणार आहे. या अखिल भारतीय मराठी संत साहित्य परिषेदेला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, आमदार , खासदार उपस्थिती राहणार आहेत, अशी माहितीही विठ्ठल पाटील यांनी दिली.
महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारकांच्या विचारांचा प्रसार करणे आणि समाजाला योग्य दिशा देणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. या संमेलनात वारकरी संप्रदाय, महानुभव पंथ, नाथ संप्रदाय, रामदासी संप्रदाय यांसारख्या विविध क्षेत्रांतील मराठी संतांच्या साहित्यावर चर्चासत्रे आणि विचारमंथन होईल. समाजाला योग्य दिशा देण्यासाठी हे संमेलन एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास अखिल भारतीय मराठी संत साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी व्यक्त केला.
आतापर्यंत याठिकाणी झालंय आयोजन –
11 नोव्हेंबर 2011 रोजी वारकरी साहित्य परिषदेची स्थापना झाली. या परिषदेच्या माध्यमातून अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आयोजन केले जात आहे. सर्वात आधी हे आयोजन 2012 साली नाशिक येथे करण्यात आले होते. त्यानंतर नवी मुंबई, शेगाव, नांदेड, पुणे, गोंदिया, लातूर, कोल्हापूर, रायगड, मुंबई, परभणी याठिकाणी या संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले.
हेही वाचा – मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री रंगले रंगात; कुटुंबियांसह साजरी केली धूलीवंदन, पाहा Photos