मुंबई, 22 मार्च : दिशा सालियन मृत्यूप्रकरण राज्यात पुन्हा एकदा चर्चेत आलंय. यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. अशातच आता माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते नारायण राणे यांनी मोठा दावा केला आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाबाबत मला त्यावेळी उद्धव ठाकरे यांचे दोन फोन आल्याचे त्यांनी म्हटलंय.
नारायण राणेंचा दावा नेमका काय? –
मुंबईत नारायण राणे यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, दिशा सालियनच्या मृत्यूची घटना समोर आली होती. त्या कालावधीत मुंबईवरून माझ्या जुहू येथील घरी चाललो होते. तेवढ्यात बांद्रा क्रॉस करत असताना, मला मिलिंद नार्वेकरांचा फोन आला.
दादा, साहेबांना बोलयचं. मी म्हटलं, कोण साहेब? त्यावेळी नार्वेकर म्हणाले, उद्धवजी. त्यांच्याबरोबर मी आहे आणि त्यांना तुमच्यासोबत बोलयचं.
आदित्य ठाकरेंचं नाव न घेण्याची केली राणेंना विनंती –
यानंतर उद्धव साहेबांना बोलताना मी म्हटलं जय महाराष्ट्र!..बोला. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही अजूनही जय महाराष्ट्र बोलतात. मला तुमच्याशी बोलयचं. तुम्हालाही मुलं आहेत. मला मुलं आहेत. तुम्ही ज्यावेळी प्रेसला बोलता आणि यावेळी आदित्यचं नाव घेता. यामुळे माझी विनंती आहे की, तुम्ही त्याचं नाव घेता. त्याचं नाव वापरता. यामुळे तुम्ही त्याचा उल्लेख करू नका, ही विनंती करण्यासाठी मी तुम्हाला फोन केला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.
नाराणय राणे पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना मी सांगितलं की, एकतर मी अमुक ठिकाणी अमुक याच्यात कोण आहे, याचा उल्लेख केलेला नाहीये. निरपराध मुलीची अत्याचार करून हत्या झाली असून त्यांना अटक व्हायला पाहिजे, अशी मागणी करतोय. म्हणून त्यामध्ये तडजोड होणार नाही.
‘आपल्या मुलाला सांभाळा!’ –
दरम्यान, फक्त तुम्ही जे तुमच्या मुलाचं नाव घेतलंय. संध्याकाळी जिथे जातो, त्यापासून त्याला तुम्ही सांभाळा. सांगा त्याला ते बरं नाही. माझ्या घरासमोर दिनू मोर्या राहतो आणि त्याच्या घरात हे संध्याकाळी साडे तीन-चार तासात काय धूमाकुळ घालतात, मला माहितीए पण तुम्हाला सांगणार नाही. म्हणून आपल्या मुलाला सांभाळा असा सल्ला दिल्याचे उद्धव ठाकरे यांना सांगितले असल्याचे नारायण राणे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी सहकार्य करण्याची देखील मागणी केली, असा दावा राणे यांनी केला.
उद्धव ठाकरेंचा राणेंना दुसरा फोन? –
उद्धव ठाकरे यांचा मला दुसऱ्यांदा फोन आला, असा दावाही नारायण राणे यांनी केला. ते पुढे म्हणाले की, कोविड काळात मला उद्धव ठाकरेंचा दुसरा फोन आला. त्यावेळी माझ्या हॉस्पिटलचा उद्घाटन होतं. आणि माझ्या हॉस्पिटलसाठी राज्य सरकारची एका परवानगीची गरज होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंचा फोन आला आणि ते म्हणाले की, राणेसाहेब तुमचा फोन आला होता. मी म्हटलं हो कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता. ते म्हणाले की, परवानगी तर मिळेलच मात्र, प्रेस घेताना तो उल्लेख टाळाल, तर बरं होईल.
राणे पुढे म्हटले की, मी त्यांना सांगितलं की, मी त्याचं नाव घेतलं नाहीये. त्या घटनेच्या वेळेला एक मंत्री होता असं मी म्हणतोय. आणि ते व्हिडिओमध्ये आलंय. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी दोन फोन केल्याचा मोठा दावा माजी मंत्री नारायण राणेंने केले असताना उद्धव ठाकरे यांच्याकडून काय प्रत्युत्तर येतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा : अजितदादा-जयंत पाटील यांच्यात भेट, संजय राऊतांची टीका, म्हणाले की, “गद्दारांशी…”