ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 20 एप्रिल : उच्च न्यायालय विधी सेवा उप समिती औरंगाबाद तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशान्वये माहे एप्रिल 2025 मध्ये जळगाव जिल्ह्यात मोबाईल लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. ही मोबाईल व्हॅन जळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यात 1 एप्रिल ते 29 एप्रिल या कालावधीत फिरणार आहे.
पाचोरा तालुक्यात फिरते लोक न्यायालयाचे आयोजन –
या पार्श्वभूमीवर तालुका विधी सेवा समिती पाचोरा व वकील बार पाचोरा यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 23 एप्रिल रोजी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन आवार तालुका पाचोरा येथे तसेच दिनांक 24 एप्रिल रोजी पाचोरा पोलीस स्टेशन आवार पाचोरा येथे सदरील मोबाईल लोक अदालत व्हॅनच्या माध्यमातून फिरते लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी जनजागृती करिता कायदेविषयक शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. सदरील मोबाईल लोक अदालतच्या माध्यमातून फिरते लोकन्यायालयाचे आयोजन नियोजन, चर्चा व विचार विनिमय करण्याकरिता घेण्यात आलेल्या आढावा सभेमध्ये एस.व्ही. निमसे साहेब, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती पाचोरा तथा दिवाणी न्यायाधीश पाचोरा तसेच जी. एस. बोरा मॅडम सहदिवाणी न्यायाधीश पाचोरा तसेच तालुक्यातील सर्व सन्माननीय ज्येष्ठ विधीज्ञ उपस्थित होते.
मोबाईल व्हॅन संधीचा लाभ घेण्याचे न्यायाधीशांचे आवाहन –
फिरते लोक न्यायालयाच्या माध्यमातून नेहमी दिवाणी दावे, नियमित दरखास्त, फौजदारी खटले, धनादेशात अनादर, वैवाहिक प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटले व ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येणे शक्य आहे असे दिवाणी व फौजदारी खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवता येतील.
याप्रसंगी न्यायाधीश एस.व्ही. निमसे यांनी पाचोरा तालुका परिसरातील नागरिकांना आवाहन केले की, 23 आणि 24 एप्रिल रोजी होणाऱ्या फिरते लोक अदालतमध्ये पाचोरा न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी स्वरूपाच्या वादातील प्रकरणे तडजोडीने सोडविण्याकरिता जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून सहभाग नोंदवावा तसेच सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. तसेच जनजागृती करता कायदेविषयक शिबिराचे देखील आयोजन केलेले असून त्याचा देखील फायदा घ्यावा व आपल्या प्रलंबित केसेस फिरते लोक अदालत मध्ये ठेवण्यासाठी तालुका विधी सेवा समिती कार्यालय, पाचोरा यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.