मुंबई, 22 मे : माजी आमदार तथा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल गोटे यांनी विधिमंडळ आमदारांच्या समितीच्या सदस्यांना देण्यासाठी साडेपाच कोटींची रक्कम शासकीय विश्रामगृहात ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. या आरोपानंतर धुळ्यातील शासकीय विश्रामगृहाच्या 102 क्रमांकाच्या खोलीत एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड आढळली. दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली असताना राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तसेच एसआयटी चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? –
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांसोबत संवाद साधताना म्हणाले की, धुळ्याची घटना अतिशय गंभीर आहे. त्याची सत्यता अजून समजलेली नाही. पण, ही सत्यता बाहेर आलीच पाहिजे. कारण, विधानमंडळाच्या समितीवर प्रश्नचिन्ह उभं राहणं हे आम्ही कदापि सहन करू शकत नाही. विधानमंडळाची एक आपली गरिमा आहे. त्यांचा आपला मान आहे. अशा परिस्थितीत दूध का दूध पानी का पानी झालंच पाहिजे.
धुळे प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार –
धुळे प्रकरणाची एसआयटी नेमून चौकशी करायचे आम्ही ठरवलेले आहे. यामध्ये कोण दोषी आहे. कोणी मागितलेले पैसे आहेत का, या सर्व गोष्टींचा छडा लावल्यात येईल. आणि त्याचवेळी मी स्वतः विधानसभेचे अध्यक्ष तसेच विधानसपरिषदेतेचे सभापती या दोघांनाही विनंती करणार आहे की, त्यांनी देखील स्वतंत्रपद्धतीने समिती स्थापन करून धुळे प्रकरणाची चौकशी करावी.
दरम्यान, कुठल्याही परिस्थितीत विधानमंडळाच्या समितीची पद्धती बदनाम होणं हे आपल्याला परवडणार नाही. म्हणून याप्रकरणात अतिशय गांभीर्याने कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
View this post on Instagram
नेमकं काय प्रकरण?-
विधिमंडळ अंदाज समितीचे सदस्य (आमदार) हे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या अभ्यास दौऱ्यावर असताना विधिमंडळाच्या आमदार समितीतील सदस्यांना धुळ्यातील शासकीय विश्रामगृहाच्या 102 क्रमांकाच्या खोलीत 5 कोटी रूपये ठेवले असल्याचा आरोप धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांना केला. दरम्यान, अनिल गोटेंच्या आरोपानंतर धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहामधील खोली क्रमांक 102 मध्ये एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड आढळली. यामुळे राज्यात खळबळ उडाली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील आता या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.