मुंबई, 10 जुलै : आमच्या शिवाय कोणीही तुमचं काम करू शकणार नाही आणि म्हणून 18 तारखेला अधिवेशन संपलं की तुमच्या खात्यात पगार जमा झालेला असेल. तुमच्या खात्यावर आधीचे टप्पे आम्हीच टाकले असून सुरुवात आम्हीच केली आहे. ही तारीख पुढे जाणार नाही. सर्वांना हा निर्णय कळवा आणि आमचं सरकार आणि शिक्षक आमदार यांच्याकडून प्रयत्न करून अधिवेशनातून घरी जाताना तुमचा पगार तुमच्या खात्यात टाकूनच आम्ही जाऊ, असे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनकर्त्या शिक्षकांना दिले. मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन स्थगित करताना ते बोलत होते.
शिक्षकांचे आंदोलन स्थगित –
राज्यातील पाच हजारांहून अधिक अंशत: अनुदानित खासगी शाळांना अनुदानाची टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने ऑक्टोबर 2024 मध्ये घेतला. मात्र, हा निर्णय गेले 10 महिने उलटूनही कागदावरच असून निधीची तरतूद न झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर राज्यातील शिक्षकांनी 8 आणि 9 जुलै रोजी शाळा बंद ठेऊन आझाद मैदानावर तीव्र आंदोलन छेडले. राज्यभरातील 15 हजाराहून अधिक शिक्षकांनी या आंदोलनात सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, गिरीश महाजन यांच्या शिष्टाईनंतर शिक्षकांचे आंदोलन स्थगित करत असल्याचे शिक्षक समन्वय संघाने घोषित केले.
View this post on Instagram
मंत्री महाजनांची विरोधकांवर टीका –
शिक्षकांच्या आंदोलनादरम्यान सरकार आणि शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची चर्चा पार पडली. त्यानुसार, 18 जुलै दरम्यान चौथ्या टप्प्याचे पगार शिक्षकांच्या खात्यात जमा होतील, असे आश्वासन राज्य सरकारतर्फे मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनकर्त्या शिक्षकांना दिले. दरम्यान, आधी त्यांचं सरकार होतं, त्यांनी त्यांच्या दालनात तरी तुम्हाला प्रवेश दिला का? त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. तुम्ही कोणावरही विश्वास ठेऊ नका, अशी टीकाही मंत्री महाजन यांनी विरोधकांवर केली.