जळगाव : गेल्या काही दिवसात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहेत. वेगवेगळ्या कारणांतून अनेक जण टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना जळगाव शहरातून समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले. काल शुक्रवारी जयनगर येथील त्यांच्या राहत्या घरी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
काय आहे संपूर्ण बातमी –
जळगाव शहरातील माजी नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांनी काल आत्महत्या करत आपले जीवन संपवले. अनंत जोशी हे जळगाव महापालिकेत दोन वेळा नगरसेवक राहिले होते. मागील काही दिवसांपासून ते तणावात होते, अशी माहिती आहे. काल शुक्रवारी जेवणासाठी त्यांच्या आईने त्यांना मोबाईलवर फोन लावला असता तो बंद आला. यावेळी गच्चीवर जाऊन पाहिले असता त्याठिकाणी एका लहान खोलीत अनंत जोशी हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.
यानंतर त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जळगाव शहरातील सर्वपक्षीय आजी-माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. बंटी जोशी हे एक अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जायचे. त्यांची विविध आंदोलनने शहरात कायम चर्चेचा विषय ठरायची. दरम्यान, त्यांच्या अत्महत्येच्या घटनेनंतर जळगावातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून अनंत जोशी यांनी आत्महत्या का केली? याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तसेच पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.