पणजी, 22 ऑगस्ट : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करण्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर, गुरुवारी गोव्याचे राज्यपाल पशूपती अशोक गजपती राजू यांनी राजभवनात झालेल्या छोटेखानी सभारंभात मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि विद्यमान सभापती रमेश तवडकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या संदर्भातील प्रस्तावाला अंतिम स्वरूप दिले. ते दिल्लीहून बुधवारी रात्री परतले, त्यानंतर त्यांनी तवडकर आणि कामत यांचा शपथविधी होणार असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले होते.
काही दिवसांपूर्वी प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी मंत्रिमंडळाची पुनर्रचना गणेश चतुर्थीपूर्वी केली जाईल, असे जे जाहीर केले होते त्याप्रमाणे पुढील आठवड्यात गणेश चतुर्थी असल्याने तत्पूर्वी ही पुनर्रचना केली जात असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, दिगंबर कामत आणि रमेश तवडकर यांना त्यांच्या नवीन कार्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देतेवेळी मुख्यमंत्री सावंत म्हणाले, कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल श्री दिगंबर कामत आणि श्री रमेश तवडकर यांचे हार्दिक अभिनंदन करतो. मला विश्वास आहे की ते गोव्याच्या विकासासाठी, प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी समर्पित भावनेने काम करतील आणि आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोव्याचे स्वप्न साध्य करतील.
या शपथविधी कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह सरकारमधील अन्य मंत्री, आमदार, भाजपचे पदाधिकारी, तसेच मडगाव आणि काणकोणमधून दोन्ही नेत्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.