ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 1 सप्टेंबर : आज पाचोरा शहरातील श्रीराम मंदिर परिसरात तालुकास्तरीय वारकरी भवनाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वारकरी भवनाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. दरम्यान, यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोऱ्यातील वारकरी भवनाच्या मंजुरीबाबतचा किस्साही सांगितला.
काय म्हणाले आमदार किशोर आप्पा पाटील?
यावेळी बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, वारकरी भवन, ग्रामीण रुग्णालयासाठी सिटिस्कॅन, एमआरआयचं मशीन असेल, बहिणाबाई चौधरींचं उद्यान असेल, मेहरुण तलावाचा विकास असेल हा सर्व निधी डीपीडीसीच्या माध्यमातून टाकतो, तो जर माझ्या पद्धतीने मी जसा वारकरी भवनासाठी राज्य सरकारकडून निधी आणला, तसा निधी आपण आणून आपण जिल्ह्यातील ग्रामीण भागाला न्याय द्यावा, अशी माफक अपेक्षा मी व्यक्त केली होती. मात्र, मला अतिशय मित्र समजणाऱ्या लोकांनी, माझ्या जवळच्या मित्रांनी काही वारकरी बांधवांच्या मनात असा खडा टाकायचा प्रयत्न केला की किशोर आप्पाने जळगावच्या वारकरी भवनाला विरोध केला. मी वारकरी संप्रदायात जन्माला आलेलो आहे. मी 1 तारखेला 5 कोटी रुपयांचं वारकरी भवन मंजूर करत आहे. मग माझा वारकरी भवनाला कसा विरोध असू शकतो, असा सवालही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे इथं बसलेल्या सर्व वारकरी बांधव, किर्तनकारांना माझी विनंती आहे की, तो जो झालेला गैरसमज आहे तो आता काढा. वस्तूस्थिती ही आहे, असेही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी यावेळी सांगितले.
याठिकाणी एका बाजूला पांडुरंगाचे मंदिर तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजाचे स्मारक, दोन्ही बाजूचा नदी, अशा सुंदर परिसरात पाचोरा शहराच्या मध्यवर्ती भागात हे दिमाखदार वारकरी भवन बांधले जाणार आहे, अशी ग्वाही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी यावेळी दिली.
वारकरी भवन ट्रस्टच्या ताब्यात देणार –
या वास्तूचे पावित्र्य राखलं जावं यासाठी हे वारकरी भवन आगामी काळात आपल्या तालुकास्तरीय वारकरी संप्रदायाच्या ट्रस्टच्या ताब्यात देण्यासाठी 100 टक्के प्रयत्न करणार आणि 2 वर्षात ही वास्तू आपल्या ताब्यात देण्यात येईल, असे आश्वासनही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी यावेळी दिले.
दरम्यान, या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, किशोर बावरकर, प्रांताधिकारी भूषण अहिरे, वारकरी संप्रदायातील अनेक किर्तनकार, मान्यवर वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.