जळगाव, 4 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना सध्या केळी दर घसरणीचा मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला बुरहानपूरचे जिल्हाधिकारी दूरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, जिल्ह्यातील केळी ही मुख्यतः उत्तर भारतात जात असते सध्या उत्तर भारतात पावसामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने जळगावमधील केळीचे बाजारभाव घसरले आहेत. त्याचबरोबर बुरहानपूर येथील काही व्यापारी संगनमत करून भाव पाडत असल्याच्या तक्रारी, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या असल्याचे जिल्हाधिकारी बुरहानपुर यांच्या निदर्शनास आणून दिले व त्यावर उपयोजना करण्याची विनंती केली.
या संदर्भात बुरहानपूर जिल्हाधिकारी यांनी तातडीने काही महत्त्वपूर्ण उपाययोजना पुढीलप्रमाणे जाहीर केल्या.
- केळीच्या लिलाव प्रक्रियेवर सीसीटीव्ही अंतर्गत नजर ठेवण्यात येणार असून लिलावांचे यूट्यूब लिंकद्वारे थेट प्रसारण करण्यात येईल.
- केळीचे बोर्ड भाव जाहीर करताना कमीतकमी 20 केळी भाव किमतीची सरासरी काढून बोर्ड भाव जाहीर करण्यात येतील.
- तसेच बुऱ्हानपूर बाजार समितीच्या बाहेर होणाऱ्या केळी पिकांच्या खरेदी व विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी चेक पोस्ट स्थापन करण्यात येतील.
- या उपाययोजनांमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळेल तसेच बाजारभाव स्थिर होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.