राजगीर (बिहार), 8 सप्टेंबर : बिहारमधील राजगीर येथे काल रविवारी 7 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या हॉकी आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत विद्यमान विजेता दक्षिण कोरियाला 4-1 अशा फरकाने पराभूत केले. दरम्यान, या विजयासह भारताने आशिया कपचे विजेतेपद मिळवले असून हा संघाचा चौथा आशिया कप किताब ठरला आहे. विशेष म्हणजे भारताने आठ वर्षांनंतर हॉकी आशिया कप जिंकलाय.
‘…अन् भारतीय हॉकी संघाने विश्वचषकासाठी मिळवली पात्रता!’ –
कर्णधार हरमनप्रीत सिंग यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या विजयासह पुढील वर्षी बेल्जियम आणि नेदरलँड यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळवलीय. याआधी भारताने 2003, 2007 आणि 2017 मध्ये आशिया कपचे विजेतेपद मिळवले होते. विशेष म्हणजे 2007 आणि 2025 या दोन्ही वेळा भारताने कोरियाला पराभूत करूनच किताब जिंकला. यासोबतच भारतीय हॉकी संघ 1982, 1985, 1989, 1994 आणि 2013 मध्ये उपविजेता ठरला होता.
‘असा’ राहिला अंतिम सामना –
हॉकी आशिया कपच्या अंतिम सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाने आक्रमक खेळ दाखवला. पहिल्याच मिनिटाला सुखजीत सिंगने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. आठव्या मिनिटाला जुगराज सिंगला पेनल्टी स्ट्रोकवर गोल करता आला नाही, तरी पहिला क्वार्टर भारताने 1-0 ने जिंकला.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये दिलप्रीत सिंगने 27 व्या मिनिटाला गोल करून भारताची आघाडी 2-0 अशी वाढवली. हाफ-टाइमपर्यंत भारताने आपले वर्चस्व कायम ठेवले. तसेच तिसऱ्या क्वार्टरमध्ये कोरियाने पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, सलग पेनल्टी कॉर्नर मिळूनही भारतीय बचावफळीसमोर त्यांची एक न चालली. उलट 44 व्या मिनिटाला दिलप्रीतनेच आपला दुसरा आणि भारताचा तिसरा गोल केला.
दरम्यान, शेवटच्या क्वार्टरमध्ये अमित रोहिदासने 49 व्या मिनिटाला अप्रतिम फील्ड गोल करून भारताची आघाडी 4-0 अशी केली. यानंतर लगेचच एका मिनिटाने कोरियाच्या डॅन सनने गोल करत फरक कमी केला; मात्र त्यानंतर भारतीय संघाने सामना पूर्णपणे आपल्या ताब्यात ठेवत 4-1 ने विजय निश्चित केला.
भारतीय हॉकी संघाची अंतिम सामन्यातील कामगिरी –
- सुरुवातीपासूनच भारताने आक्रमक खेळ दाखवला.
- पहिल्याच मिनिटाला सुखजीत सिंगने गोल करून आघाडी मिळवून दिली.
- 27 व्या मिनिटाला दिलप्रीत सिंगचा गोल; हाफ-टाइमपर्यंत भारत 2-0 ने पुढे.
- 44 व्या मिनिटाला दिलप्रीतचा दुसरा गोल, आघाडी 3-0.
- 49 व्या मिनिटाला अमित रोहिदासने शानदार फील्ड गोल, भारत 4-0 ने आघाडीवर.
- लगेचच कोरियाच्या डॅन सनने एक गोल केला; पण अखेर भारताने 4-1 ने विजय मिळवला.
भारताने चौथ्यांदा विजेतपद मिळवलं –
हॉकी आशिया कपच्या अंतिम सामन्यातील विजयामुळे भारताने चौथ्यांदा आशिया कप जिंकला आहे. याआधीचे तीन विजय अनुक्रमे 2003, 2007 आणि 2017 मध्ये मिळाले होते. दरम्यान, आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय संघ पुन्हा आशिया कपचा विजेता ठरला आहे.
आशिया कपमधील आतापर्यंतची भारतीय हॉकी संघाची कामगिरी :
- विजेतेपद : 2003, 2007, 2017, 2025
- उपविजेतेपद : 1982, 1985, 1989, 1994, 2013






