मुंबई, 12 सप्टेंबर : सी.पी.राधाकृष्णन आज 12 सप्टेंबर रोजी सकाळी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात आयोजित सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राधाकृष्णन यांना शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, एनडीए सरकारमधील केंद्रीय मंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित होते.
जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी अचानक राजीनामा दिल्यानंतर, 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार असलेल्या राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांचा 152 मतांनी पराभव करून उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली.
View this post on Instagram
‘अशी’ पार पडली उपराष्ट्रपती पदाची निवडणूक –
सीपी राधाकृष्णन यांची देशाचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली असून उपराष्ट्रपती पदाच्या या निवडणुकीत एकूण 767 खासदारांनी मतदान केले आणि त्यापैकी 752 मते वैध ठरली. एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली. तसेच त्यांचे विरोधक इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली. दरम्यान, राधाकृष्णन यांनी ही निवडणूक 152 मतांच्या फरकाने जिंकली.
महाराष्ट्र राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यकारभार आचार्य देवव्रत देवव्रत यांच्याकडे –
उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर सी. पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती भवनाने काल गुरूवार 11 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी राधाकृष्णन यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सोपवला असून देवव्रत आता दोन्ही राज्यांच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळतील.