मुंबई, 20 सप्टेंबर : राज्यात नुकतीचे पोलीस भरतीबाबत घोषणा करण्यात आला असताना तरूणांसाठी एसटी महामंडळातील नोकरभरतीबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. भविष्यात राज्यात आठ हजार नवीन बसेस सुरू होणार असल्याने त्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची मोठी आवश्यकता असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (ST) कंत्राटी पद्धतीने 17,450 चालक व सहाय्यक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
30 हजार रुपये इतके किमान वेतन मिळणार –
दरम्यान, निविदा प्रक्रिया येत्या 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या भरतीमुळे राज्यातील हजारो बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध होणार असून 30 हजार रुपये इतके किमान वेतन मिळणार आहे. तसेच उमेदवारांना एसटीकडून आवश्यक असलेले प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
बससेवा सुरळीत मनुष्यबळाची आवश्यकता –
परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी चालक व सहाय्यक मनुष्यबळाची आवश्यकता आहे. कंत्राटी पद्धतीने तीन वर्षांच्या कालावधीसाठी मनुष्यबळ घेण्यात येणार आहे. ही ई-निविदा प्रक्रिया सहा प्रादेशिक विभागनिहाय राबविण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांना अखंडित, सुरक्षित आणि दर्जेदार बससेवा पुरविणे शक्य होईल.
बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार –
राज्य सरकारने महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर या भरती प्रक्रियेला गती मिळालीय. यामुळे यामुळे पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे एसटी भरती आणि पोलीस भरती या दोन्ही प्रक्रियेतून राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.