पाचोरा, 13 नोव्हेंबर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी राज्यात सर्वत्र रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान, नगरपरिषद तसेच नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
‘निवडणूक प्रभारी’ म्हणून नियुक्ती –
शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची स्थानिक स्वराज्य संस्था – नगरपरिषद-नगरपंचायत निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या वतीने ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यावर पाचोरा, भडगाव, जामनेर नगरपरिषदांसह शेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाचोरा-भडगाव मतदारसंघात शिवसेना ही स्वबळावर लढेल अशी घोषणा आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केली. शिवसेना आणि मित्र पक्षांना संपविणे हीच भाजपची पॉलिसी असल्याचा खळबळजनक आरोपही आमदार पाटील यांनी केला होता. दरम्यान, राज्यात महायुती असताना देखील पाचोरा-भडगावमध्ये स्वबळाची घोषणा करणारे आमदार किशोर आप्पा पाटील पहिले आमदार होते. यानंतर त्यांना आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निवडणूक प्रभारी म्हणून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निवडणूक प्रभारी म्हणून वरणगाव, भुसावळ, धरणगाव आणि नशिराबाद नगरपरिषदेची जबाबदारी देण्यात आलीय. तसेच चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यावर चोपडा, फैजपुर आणि यावल नगरपरिषदेची जबाबदारी देण्यात आलीय. यासोबतच पारोळ्याचे आमदार अमोल पाटील यांची एरंडोल आणि पारोळा नगरपरिषेदेसाठी निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे रावेर, सावदा आणि मुक्ताईनगर नगरपरिषदेची जबाबदारी देण्यात आली. तर शिंदेंच्या शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेले माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे अमळनेर नगरपरिषदेची जबाबदारी देण्यात आली आहे.






