भुसावळ (जळगाव), 24 नोव्हेंबर : जळगाव जिल्ह्यात आम्ही महिलाराज आणतोय आणि हा महिलाराज आणण्याकरिता तसेच जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिकेला सक्षम करण्याकरिता 2 तारखेला कमळ चिन्हाचे बटण दाबावे. मी तुम्हाला एवढचं सांगतो, 2 तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या पुढच्या पाच वर्षाची जबाबदारी आम्ही घेऊ, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित मतदारांना केले. भुसावळमध्ये आयोजित जाहीर सभेत ते आज 24 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी बोलत होते.
View this post on Instagram
जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका तसेच नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा नाहाटा कॉलेज समोरील पटांगणात पार पडली. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील तसेच सर्व नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठीचे भाजपचे अधिकृत उमेदवार व भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
“भुसावळमध्ये टेक्सटाईल्स उद्योग आणण्यासाठी पुढाकार घेणार!” –
भुसावळमध्ये टेक्सटाईल्स उद्योगाची उभारणीची मागणी होतेय. याबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मी जानेवारी महिन्यात दावोस येथे जातोय. मी दावोस येथून एकतरी टेक्सटाईल्स उद्योग आणल्याशिवाय राहणार नाही. यासाठी पुर्णपणे पुढाकार मी घेणार असल्याचेही ते म्हणाले. दीपनगरमध्ये 650 मेगाव्हॅटचा प्रकल्प पुर्ण झाला असून आता 800 मेगाव्हॅटचा प्रकल्प पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
View this post on Instagram
“लाडकी बहिण योजना कोणीही बंद करू शकत नाही” –
मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंतचा उपचार मोफत करण्यात आला. यामध्ये 1300 रोगांपर्यंत उपचार करण्यात येत होते. मात्र, 2400 रोगांना 5 लाखांपर्यंतच्या खर्च पुर्णपणे मोफत देतोय. त्याहून अधिक म्हणजे 2700 रोगांना 5 लाख रूपयांहून अधिकची मदत राज्य शासनाच्यावतीने करण्यात येत आहेत. दरम्यान, लाडकी बहिण योजना बंद होईल, असे विरोधकांकडून सातत्याने सांगण्यात येते. मात्र, जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहिण योजना कोणीही बंद करू शकत नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
“भाजपच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या!” –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकासाचा झंझावात पाहायला मिळतोय. देशात आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जनतेचा आशीर्वाद घेऊन विकासाची कास धरलेले सरकार कार्यरत असल्याचे पाहायला मिळते आणि आता त्याच विचारांचे सरकार नगरपालिका-नगरपंचायतमध्ये स्थापित करायचे आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे व नगरसेवक पदाचे सर्व भाजपाचे अधिकृत उमेदवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आता जळगाव जिल्हाच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि यामुळे राज्यात सर्वाधिक जागा ह्या उत्तर महाराष्ट्रात निवडून येतील, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
भुसावळात टेक्सटाईल्स पार्क मंजूर करण्यात यावा – मंत्री संजय सावकारे
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित केलेली ही सभा फक्त भाजपच्या उमेदवारांसाठी आहे. ज्याठिकाणी युती आहे त्याठिकाणी युतीसाठी काम करायचंय आणि जिथे युती नाही तिथे फक्त आणि फक्त भाजपसाठी काम करायचंय आणि उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचंय, असेही मंत्री सावकारे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी टेक्सटाईल्स पार्क मंजूर करण्यात यावा, अशी मागणी मंत्री संजय सावकारे यांनी यावेळी केली.
विधानसभा-लोकसभा निवडणुकीतील प्रश्न वेगळे असतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील प्रश्न वेगळे असतात. यामुळे भुसावळसह इतर नगरपालिका तसेच नगरपंचायतमधील ज्या काही समस्या येत्या काळात लवकरच सुटतील, असेही मंत्री सावकारे म्हणाले.






