अयोध्या, 25 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशमधील अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. राम मंदिराच्या शिखरावरील भव्य ध्वज हा 11 फूट रुंद आणि 22 फूट लांबीचा असून या ध्वजारोहण सोहळ्याची अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, या सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवत यांच्या देशभरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते आज दुपारी ध्वजारोहण –
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 12 ते 12.30 दरम्यान ध्वजारोहण करणार असून या ध्वजावर भगवान श्री रामांच्या तेजस्वी आणि शौर्याचं प्रतीक असलेल्या तेजस्वी सूर्य तसंच कोविदार वृक्षाच्या प्रतिमेसह “ओम” लिहिलेले आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्यातील राम मंदिरासह शहरातील अनेक भागात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अयोध्या नगरीत मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला असून देशभरातून अनेक भाविक अयोध्या नगरीत दाखल होत आहेत.
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत हाय अलर्ट –
अयोध्येत मंगळवारी श्रीराम जन्मभूमीवर होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रम तसेच पंतप्रधानांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अयोध्येत हाय सिक्युरिटी अलर्ट जारी करून विशेष निगराणी वाढवण्यात आलीय. कोणत्याही प्रकारची सुरक्षा त्रुटी टाळण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रमुख मार्गांवर, कार्यक्रम स्थळी आणि परिसरातील भागांत अतिरिक्त पोलीस दल तैनात केलंय. यासोबतच आरोग्य विभागदेखील पूर्णपणे सज्ज झाला आहे.
राम मंदिर उभारणीचा प्रवास –
- 9 नोव्हेंबर 2019 – सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालानंतर राम मंदिर उभारणीला हिरवा कंदील मिळाला आणि ट्रस्टमार्फत बांधकामाची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.
- 5 फेब्रुवारी 2020 – राम मंदिराच्या बांधकाम आणि व्यवस्थापनासाठी ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ या ट्रस्टची अधिकृत घोषणा करण्यात आली.
- 5 ऑगस्ट 2020 – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मंदिराचे भूमिपूजन पार पडून प्रत्यक्ष बांधकामाची पायाभरणी झाली.
- 20 ऑगस्ट 2020 – भूमिपूजनानंतर काही दिवसांतच मंदिराच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली.
- 22 जानेवारी 2024 – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गर्भगृहात प्रभू रामलल्लाच्या मूर्तीची विधीपूर्वक प्रतिष्ठापना करण्यात आली.
- 5 जून 2025 – मंदिरात रामलल्लासोबतच इतर सात देव-देवतांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली.
- 25 नोव्हेंबर 2025 – भव्य राम मंदिराच्या शिखरावर ध्वजाची प्रतिष्ठा करून रामलल्लाच्या दरबारात ऐतिहासिक ध्वजारोहणाचा सोहळा पार पडणार आहे.






