बीड, 11 फेब्रुवारी : राज्यात पोलिस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून विविध जिल्ह्यात आजपासून शारीरिक चाचणी प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. अशातच आता बीड जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीडमधील पोलीस कवायत मैदानावर पोलीस भरती प्रक्रियेत 1600 मीटर धावताना तरुणाचा मृत्यू झाला आहे. दीपक वाव्हळ (रा. परळी जि.बीड) असं मृत तरुणाचं नाव आहे. हायड्रेशनमुळे हार्ट अटॅक आला असण्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला जात आहे.
नेमकी बातमी काय? –
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बीड जिल्हा पोलीस दलातील 174 रिक्त पदांसाठी आज (11 फेब्रुवारी)पासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ही भरती 18 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, 8 हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यासाठी आजपासून मैदानी चाचणीला सुरूवात झाली आहे.
…अन् तरूणाचा मृत्यू –
आज मैदानी चाचणीच्या पहिल्या दिवशी दुपारी सुमारे 12.45 वाजता 1600 मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी दिपव व्हावळ याचा क्रमांक लागला. धाव घेत असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो मैदानावर कोसळला. दरम्यान, तात्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
बीडमध्ये पोलीस भरती प्रक्रियेस सुरूवात –
बीड शहरातील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पहाटे 5.30 वाजता प्रक्रियेला प्रारंभ झाला. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने पार पडाव्यात यासाठी वरिष्ठ अधिकारी विशेष लक्ष ठेवून आहेत. संपूर्ण प्रक्रियेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून, धावण्याच्या स्पर्धेसाठी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त ‘फोटो फिनिश’ तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय, मैदान परिसरात सीसीटीव्ही आणि व्हिडिओ चित्रीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.






