जळगाव, 6 एप्रिल: राज्यातील क्रीडा संस्कृतीला जागतिक स्तरावर नेण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये खेळल्या जाणाऱ्या १२ क्रीडा प्रकारांवर लक्ष केंद्रित करत “मिशन लक्ष्यवेध” ही योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात चार क्रीडा प्रकारांसाठी जिल्हास्तर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार मैदानी क्रीडा, बॉक्सिंग व बॅडमिंटन (जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव) तसेच कुस्ती (तालुका क्रीडा संकुल, चाळीसगाव) या क्रीडा प्रकारांसाठी प्रत्येकी २० खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.
या योजना त्रिस्तरीय स्वरूपाच्या असून राज्य स्तरावर हाय परफॉर्मन्स सेंटर, विभागीय स्तरावर स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर आणि जिल्हा स्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र अशाप्रकारे राहणार आहे. खेळाडूंच्या निवडीसाठी २१ वर्षांखालील मुले व मुली पात्र राहणार असून जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीचे प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट फोटो, शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र व पालकांचे संमतीपत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
तसेच महाराष्ट्र राज्यातील खेळाडू असला पाहिजे. तसेच किमान राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग किंवा पदकप्राप्ती असलेले खेळाडू पात्र राहतील. निवड प्रक्रियेत क्रीडा कौशल्य व तंदुरुस्ती (फिटनेस) चाचणी तसेच शासनमान्य डॉक्टरांकडून वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य राहणार आहे. तज्ञ समितीद्वारे पात्र खेळाडूंची निवड करून त्यांना प्रशिक्षण, क्रीडा साहित्य, पूरक आहार तसेच स्पर्धांमध्ये सहभागाचा खर्च या योजनेतून देण्यात येणार आहे.
दरम्यान, इच्छुक खेळाडूंनी आपले अर्ज दि. ६ एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत ए विंग, श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी सचिन निकम (मो. ८८५६०९३६०८) यांच्याशी संपर्क साधावा.
हेही वाचा: किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 21 | कथा राज्यपालांना तोफांची ‘सरबत’ देण्याच्या प्रथेची!






