मुंबई, 13 एप्रिल: ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा, राज्य सरकारमधील मंत्री तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आशा भोसले यांचे काल, 12 एप्रिल रोजी सकाळी मुंबईतील बीच कँडी रुग्णालय येथे निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी ११ वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव लोअर परेल येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
View this post on Instagram
यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अखेरचा निरोप देताना “आशा भोसले अमर रहे” आणि “जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत, आशाताईंचे नाव कायम राहील” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
आशा भोसले यांचे पार्थिव शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत पोहोचताच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंतिम दर्शनाचे विधी पार पडले. दरम्यान, पोलिस विभागाकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. शासकीय इतमामात सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर उपस्थितांच्या अश्रुपूर्ण वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
हेही वाचा: सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार






