चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 27 एप्रिल: मागील दहा–बारा वर्षांच्या तुलनेत शेतकऱ्यांनी शेती पद्धतीत आमूलाग्र बदल केले असून त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. मात्र, आगामी काळात रासायनिक खतांचा वापर कमी करणे आवश्यक आहे. बदलत्या हवामानाच्या आव्हानांचा स्वीकार करून शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे, असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले. पाचोरा व भडगाव तालुक्यांसाठी आयोजित संयुक्त खरीपपूर्व नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
कृषी विभागाच्या वतीने पाचोरा शहरातील आशीर्वाद हॉल येथे आज, 27 एप्रिल रोजी दुपारी शेतकऱ्यांसाठी खरीपपूर्व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पाचोरा तालुका कृषी अधिकारी व्ही. एस. कराड आणि भडगाव तालुका कृषी अधिकारी दीपक ठाकूर यांनी 2025–26 या वर्षात कृषी विभागाकडून राबविण्यात आलेल्या कामांचा लेखाजोखा सादर केला. तसेच खरीप हंगाम 2026 साठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचाही सविस्तर आढावा मांडला.
तरुणांना प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाची गरज –
आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील तरुणांनी मुंबई-पुण्यासारख्या शहरांत कमी पगाराच्या नोकऱ्या करण्यापेक्षा आपल्या कुटुंबातील शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळू शकते. पाचोरा-भडगाव तालुक्यात अनेक तरुण शेतकरी प्रयोगशील शेती करत असून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न कमवत आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला दिशाहीन झालेल्या तरुणांना अशा प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात कृषी विभागाच्या वतीने पाचोरा-भडगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात तरुण शेतकऱ्यांना दिशा देण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात यावा, असेही ते म्हणाले.
‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ संकल्पना प्रत्यक्षात राबवावी –
‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ ही संकल्पना प्रत्यक्षात प्रभावीपणे राबवली गेली पाहिजे. यासाठी राज्य शासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. या अनुषंगाने पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आगामी काळात धरणांमधील गाळ काढून तो आपल्या शेतात टाकल्यास पुढील चार-पाच वर्षांत रासायनिक खतांची गरज भासणार नाही, असे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले. तसेच शेतात गाळ टाकताना महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
“…तर पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकरी सक्षम होईल!” –
वनविभागाच्या हद्दीत येणाऱ्या नाल्यां व धरणांमधील गाळ काढण्यासाठी सध्या परवानगी मिळत नसल्याची अडचण आहे. यावर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून सविस्तर अहवाल तयार करून जिल्हाधिकारी, वनसंरक्षक तसेच संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. धरणांमधील गाळ काढण्यास ‘विशेष बाब’ म्हणून परवानगी मिळावी, यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील.
तसेच पाचोरा-भडगाव तालुक्यातील वनविभागाच्या हद्दीतील धरणांमधील गाळ काढण्यास विशेष परवानगी मिळाल्यास योग्य पद्धतीने खोलीकरण होऊन पाण्याचा मुबलक साठा निर्माण होईल. परिणामी, पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकरी शंभर टक्के सक्षम होईल, असा विश्वास आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला.
कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालकांनी आपला संप मागे घ्यावा –
खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला असताना कृषी केंद्र चालक संपावर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालकांनी आपला संप मागे घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. मागील दहा-बारा वर्षांच्या कालवधीत शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मुबलकप्रमाणात विशेषतः दिवसा वीज मिळावी यासाठी अनेक अडचणींवर मात करत महावितरणच्यावतीने महत्वपुर्ण उपाययोजना केल्या असल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले.

मात्र, वीज मुबलक प्रमाणात निर्मिती होत असताना तिचे वितरण व्यवस्थितरित्या होणे गरजेचे असून महावितरणने याबाबत उपाययोजना कराव्यात असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. वीजेच्या तारा तटुणे आणि यामुळे शेतकऱ्यांची पीके जळून खाक होतात.मात्र, त्याचा मोबदला वेळत मिळत नाही. यासाठी महावितरणने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी महत्वाची पावले उचलली पाहिजेत, असेही ते म्हणाले.

प्रांताधिकारी भूषण अहिरे काय म्हणाले? –
प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, खरीप हंगाम 2026 च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच ‘मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना’ अंतर्गत शासनाच्या आदेशानुसार पाचोरा-भडगाव तालुक्यात महसूल विभागाकडून लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी शेतकऱ्यांनी महसूल विभागाच्या पथकाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, शेतकऱ्यांना शेतीकामासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आल्याची माहिती महावितरणचे उपविभागीय अधिकारी खोडपे यांनी दिली.
शेतकरी तसेच कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान –
या कार्यक्रमात पीक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करून पीक पद्धतीत बदल घडविणाऱ्या शेतकऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. याशिवाय पाचोरा-भडगाव तालुक्यातील कृषी विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
यावेळी ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ अंतर्गत मंजूर झालेल्या सानुग्रह अनुदानाचे प्रातिनिधिक वितरण करण्यात आले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी ‘कृषी यांत्रिकीकरण योजना’ अंतर्गत लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात ट्रॅक्टर व हार्वेस्टरचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन भडगाव तालुका कृषी अधिकारी दीपक ठाकूर यांनी केले.
यांची होती उपस्थिती –
याप्रसंगी प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, कृषी विज्ञान केंद्राचे …., प्रगतशील शेतकरी प्रविण पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल पाटील, शिवसेनेचे अरूण पाटील, यांच्यासह पाचोरा-भडगाव तालुक्यातील कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






