जळगाव, 31 जुलै: जळगाव जिल्ह्याला भारतीय हवामान विभागाकडून काल 30 जुलै रोजी रेड अलर्ट तर आज येलो अलर्ट देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पाऊस झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला असून धरणांच्या जलसाठ्यांमध्ये देखील वाढ झाली आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध ठिकाणी तातडीने उपाययोजना व बचावकार्य पार पडत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर; कुठे काय घडलं? –
जळगावमध्ये दुकानांमध्ये पावसाचे शिरले पाणी –
जळगाव शहरातील गांधी मार्केट येथे बेसमेंटमधील सर्व दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. सद्यस्थितीत काही दुकाने पाण्यामुळे बंद ठेवण्यात आली असून, काही दुकानदार आवश्यक ती खबरदारी घेत व्यवसाय सुरू ठेवत आहेत. संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवून पाणी उपसण्याचे व आवश्यक उपाययोजनांचे काम सुरू आहे.

भडगाव तालुक्यातील बात्सर येथे बचाव कार्य –
भडगाव तालुक्यातील मौजे बात्सर येथे मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्याने ५ लहान बालके व ३ महिला घरात अडकून पडल्या होत्या. माहिती मिळताच आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने, व आपत्ती व्यवस्थापन पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून यशस्वी बचाव कार्य राबविले. तसेच सदर ठिकाणी आमदार किशोर आप्पा पाटील व तहसिलदार शीतल सोलाट आदी उपस्थित होते.

सर्व ५ बालके व ३ महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, त्यांची गावातच सुरक्षित निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सर्वजण सुरक्षित असून प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.

अमळनेर एक महिन्याच्या बाळाला सुखरूप पुरातून बाहेर काढले –
अमळनेर शहरातील भालेराव नगर येथील गुरुकृपा कॉलनीत नाल्याला आलेल्या पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. पुराचे पाणी घरात शिरल्याने अवघ्या एक महिन्याच्या बाळासह एक कुटुंब जीव मुठीत धरून अडकले होते. छातीएवढ्या पाण्यात घरातील सदस्य उंच जागेवर उभे राहून मदतीची वाट पाहत होते. घटनेची माहिती मिळताच पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या निर्देशानुसार आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, गोल्डी बिऱ्हाडे तसेच अग्निशमन दलाचे फारुख शेख, दिनेश बिऱ्हाडे, भिका संदानशीव आणि पवन बिऱ्हाडे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने दोर व लाइफ जॅकेटच्या साहाय्याने साखळी तयार करून तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बचावकार्य करण्यात आले. एक महिन्याच्या बाळाला प्लास्टिकच्या टबमध्ये सुरक्षित ठेवून त्याच्यासह आई, तीन महिला, तीन लहान मुले आणि इतर सदस्यांना जवळील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुखरूप हलविण्यात आले. अग्निशमन दल व पालिका कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पाचोरा तालुक्यात नेमकी काय परिस्थिती –
पाचोरा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हिवरा, तीतूर व बाहुला नद्यांना पूर आला असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्रात अथवा पूरग्रस्त भागात जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले असून संबंधित गावांमध्ये पोलीस पाटील, कोतवाल व तलाठी हे प्रत्यक्ष उपस्थित राहून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवत आहेत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, पाचोरा नगर परिषद हद्दीतील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पाणी उपसा, मदतकार्य आणि आवश्यक उपाययोजना करत आहेत.

तसेच साजगाव–कुऱ्हाड मार्गावरील नाल्याला पाणी आल्यामुळे हा रस्ता तात्पुरता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून पर्जन्यमान व नदी-नाल्यांच्या पाणीपातळीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि अत्यावश्यक कामाशिवाय पूरग्रस्त भागात जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
चोपड्यात रस्त्यांवर पडली झाडे –
मुसळधार पावसामुळे चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील अनेक ठिकाणी झाडे पडल्याने रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र संबंधित यंत्रणांनी तातडीने झाडे हटवून रस्त्याची साफसफाई केल्यानंतर हा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सध्या या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू असून प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.

ममुराबाद मे 40 घरांमध्ये शिरलं पाणी –
ममुराबाद येथे मुसळधार पावसामुळे लेंडी नाल्याला आलेल्या पुरामुळे सुमारे ४० घरांमध्ये पाणी शिरून पूरस्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासन, ग्रामपंचायत व संबंधित यंत्रणांनी तातडीने नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्रशासनाकडून परिसरातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून मदत व बचावकार्य सुरू आहे.

पारोळ्यात अतिवृष्टीग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी –
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पारोळा तालुक्यातील मुंदाणे (प्र. उ.) व देवगाव गावांची जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी संबंधित मतदारसंघाचे आमदार व तहसीलदार उपस्थित होते. देवगाव येथे काही शेतकऱ्यांच्या जनावरांचा मृत्यू झाला असून काही जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रशासनाकडून पंचनामे व पुढील आवश्यक कार्यवाही सुरू आहे.

बोदवडमध्ये पावसामुळे पाणी साचलेल्या ठिकाणी तातडीने उपाययोजना सुरू –
बोदवड नगरपालिकेची यंत्रणा पाणी साचलेल्या भागात त्वरित पोहोचून कचरा हटविणे, नाल्यांतील अडथळे दूर करणे तसेच साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व अनावश्यकपणे पाणी साचलेल्या भागात जाणे टाळावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

भुसावळमध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना –
भुसावळमध्ये पावसामुळे पाणी साचलेल्या ठिकाणी तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या. तसेच भुसावळ नगरपालिकेची यंत्रणा पाणी साचलेल्या भागात त्वरित पोहोचून कचरा हटविणे, नाल्यांतील अडथळे दूर करणे तसेच साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.

यावलमध्ये मुसळधार पाऊस; प्रशासनाकडून महत्वाचे आवाहन –
यावल तालुक्यातील वड्री धरण, निंबा देवी धरण व मनू देवी धबधबा परिसरात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील वड्री धरण व निंबा देवी धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच पावसामुळे मनू देवी धबधबा देखील प्रवाहित झाला असून परिसरातील नागरिकांना तसेच पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, धरण परिसर, धबधबा, नदी-नाले, पूल, पाण्याचा वेग असलेले प्रवाह तसेच पाण्याखाली गेलेले रस्ते यांच्या जवळ जाणे अथवा अनावश्यक वावर टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात वाढ –
जळगाव जिल्ह्यातील हतनूर, अंजनी तसेच गिरणा धरणाच्या जलसाठ्यांमध्ये वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने धरणातील जलपातळी झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज हतनूर धरणाला भेट देत धरणातील जलसाठा, पाण्याची आवक, विसर्ग व्यवस्था तसेच संभाव्य पूरस्थितीचा सखोल आढावा घेतला.







