जळगाव, 26 मे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ‘TWJ असोसिएट्स प्रा. लि.’ या पुण्यातील कंपनीच्या मुख्य संचालक दाम्पत्याला जळगाव आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. समीर नार्वेकर (वय 35) आणि नेहा नार्वेकर (वय 36, दोन्ही रा. गिमवी, ता. गुहागर जि. रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, दोघांनाही ठाणे मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेऊन जळगावात आणण्यात आले. न्यायालयाने त्यांना २९ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कंपनीविरोधात राज्यभरात ८ गुन्हे दाखल –
‘TWJ असोसिएट्स प्रा. लि.’ शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील २७९ गुंतवणूकदारांची तब्बल २३ कोटी ८१ लाख रुपयांहून अधिक रक्कम बुडाल्याचे समोर आले आहे. तसेच या कंपनीविरोधात राज्यभरात ८ गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. यामध्ये यवतमाळ, रत्नागिरी, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, रायगड आणि छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.
या सर्व प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांसह MPID कायदा तसेच अनियंत्रित ठेव योजना प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठाणे शहरातील श्रीनगर पोलीस ठाण्याने समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर या दोघांना २९ जानेवारी २०२६ रोजी अटक केली होती. ते न्यायालयीन कोठडीत असल्याने जळगाव आर्थिक गुन्हे शाखेने त्यांचा ताबा घेत पुढील तपास सुरू केला आहे.
गुंतवणूकदारांना परतावा न देता रकमेचा अपहार केल्याचा आरोप –
मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२५ दरम्यान आरोपींनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने विविध ठिकाणी सेमिनार घेऊन लोकांना गुंतवणुकीसाठी आकर्षित केले. शेअर मार्केट ट्रेडिंगमधून मोठा परतावा मिळेल, असे सांगून त्यांनी गुंतवणूकदारांकडून ११ महिन्यांच्या मुदतीसाठी कोट्यवधी रुपये जमा केले. मात्र, मुदत पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदारांना परतावा न देता रकमेचा अपहार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी पाळधी येथील भरत पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कंपनीचा जळगावमधील फ्रेंचायझी प्रमुख मिलिंद पाटील यालाही यापूर्वी अटक करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
तपासात सहभागी असलेले पथक –
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक सदाप गावित आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ. विकास पहुरकर, पोहेकॉ. घनश्याम पवार, मपोहेकॉ. स्मिता पाटील, पोहेकॉ. विलास तायडे, पोहेकॉ. रतिलाल पवार, पोहेकॉ. भरत जेटवे, पोहेकॉ. निलेश सुर्यवंशी, पोहेकॉ. मुददसर काझी, पोकॉ. नवल हटकर व पथक करीत आहे. तसेच, TWJ असोसिएट्स प्रा. लि.च्या जळगाव शाखेत गुंतवणूक केलेल्या नागरिकांनी आपल्या गुंतवणुकीची माहिती आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव येथे देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: एसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबविणार – मंत्री प्रताप सरनाईक






