चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 1 जून: विधानपरिषद निवडणुकीसाठी जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीत भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असताना ही जागा भाजपच्या वाटेला आली आहे. अनेक राजकीय घडामोडीनंतर भाजपने अखेर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर (नंदू) महाजन यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. तर दुसरीकडे भाजपकडून इच्छुक असलेल्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने शिवसेनेच्या भूमिकेकडे देखील लक्ष असणार आहे.
शिवसेनेच्या भूमिकेकडे असणार लक्ष –
जळगावच्या जागेसाठी महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुरुवातीपासूनच अत्यंत आग्रही भूमिका घेतली होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रताप पाटील तसेच आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमीत पाटील यांच्या नावांची मोठी चर्चा होती. मात्र, जागावाटपात ही जागा भाजपकडे गेल्याने शिवसेनेच्या आशांवर पाणी फिरले आहे. अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी शिंदे यांची शिवसेना बंडखोरी करणार की महायुतीचा धर्म पाळत महाजन यांना पाठिंबा देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भाजपमधील अनेक बड्या इच्छुकांचा हिरमोड –
जळगावच्या जागेसाठी भाजपमधून उद्योजक नंदू अडवाणी, माजी आमदार चंदुलाल पटेल, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील तसेच अमोल शिंदे, आदी नेते इच्छुक होते. महिला नेतृत्वाला संधी मिळेल या आशेने केतकी पाटील यांच्या समर्थकांनी मुंबई-दिल्लीपर्यंत मोर्चेबांधणी केली होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी ऐनवेळी गिरीश महाजन यांच्या कट्टर समर्थकाला तिकीट दिल्यामुळे भाजपमधील अनेक इच्छुकांचा तीव्र हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.
आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; राजकीय हालचालींना वेग –
स्थानिक स्वराज्य संस्थेतील आकडेवारी आणि संघटनात्मक ताकदीच्या जोरावर भाजपने हा मतदारसंघ आपल्याकडेच राखण्यात यश मिळवले आहे. नंदकिशोर महाजन हे आज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, शिवसेनेची आजची प्रत्यक्ष भूमिका आणि भाजपमधील नाराज गट यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस वाढणार, हे आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.
विधान परिषद निवडणूक कार्यक्रम –
- अधिसूचना जारी : 25 मे
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून
- अर्जाची छाननी : 2 जून
- अर्ज माघारीची शेवटची तारीख : 4 जून
- मतदान : 18 जून – स. 8 ते दु. 4.
- मतमोजणी : 22 जून






