जळगाव, 4 जून: महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या योजनेत लाभार्थ्यांना अत्यावश्यक संच व सुरक्षा संच वितरित करताना केवायसीच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) यशस्वी सापळा कारवाई केली आहे.
या कारवाईत भाग्यश्री विजय पाटील (वय २०, रा. सामनेर, ता. पाचोरा, जि. जळगाव) या खाजगी व्यक्तीस तक्रारदाराकडून १०० रुपयांची मागणी करून ती स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
नेमकं प्रकरण काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील तक्रारदाराने शासनाच्या योजनेअंतर्गत अत्यावश्यक संच व सुरक्षा संच मिळविण्यासाठी ३ जून रोजी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यानंतर ४ जून रोजी वावडदा (ता. जि. जळगाव) येथे संच स्वीकारण्यासाठी उपस्थित राहण्याचे पत्र त्यांना मिळाले होते.
तक्रारदार संच घेण्यासाठी केंद्रावर गेले असता भाग्यश्री पाटील यांनी केवायसी प्रक्रियेसाठी दोन फॉर्म खरेदी करावे लागतील, असे सांगून त्यासाठी १०० रुपयांची मागणी केली. मात्र, लाभार्थ्यांना हे संच शासनाकडून पूर्णपणे मोफत दिले जात असून कोणत्याही प्रकारची फी किंवा लाच देण्याची आवश्यकता नसल्याचे अर्जावर स्पष्ट नमूद असल्याने तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. पंचांसमक्ष भाग्यश्री पाटील यांनी १०० रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा कारवाईदरम्यान त्यांनी तक्रारदाराकडून १०० रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
घटनास्थळावरून २६ हजार ७७० रुपये रोख रक्कम हस्तगत –
कारवाईदरम्यान घटनास्थळावरून विविध मूल्यांच्या नोटांसह १३ हजार ६७० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच झेरॉक्स मशीनजवळील स्टीलच्या डब्यातून आणखी १३ हजार १०० रुपये आढळून आले. अशा प्रकारे एकूण २६ हजार ७७० रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. ही रक्कम लाभार्थ्यांकडून केवायसीच्या मोबदल्यात घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी भाग्यश्री पाटील यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस निरीक्षक हेमंत, रेश्मा अवतारे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोकॉ. बाळू मराठे, पोकॉ. राकेश दुसाने यांनी ही कारवाई केली. दरम्यान, भ्रष्टाचारसंबंधी काही माहिती असल्यास अथवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल काही तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा: राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025: महाराष्ट्रातील ‘या’ चार ग्रामपंचायतींचा नवी दिल्लीत गौरव






