जळगाव, 27 जून: उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर करून शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पैठण येथील नाथसागर धरणाचे पाणी जोगेश्वरी डोंगररांगापर्यंत पाइपलाइनद्वारे आणण्याचा महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्प राबविण्याची मागणी शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, जामनेर तसेच शेजारील सोयगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) या भागांना दरवर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. अपुर्ण पाऊस, मोठ्या नद्यांचा अभाव आणि वाढते तापमान यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक गंभीर बनत आहे.
या पार्श्वभूमीवर पैठण येथील नाथसागर जलाशयातून सुमारे दोन मीटर व्यासाच्या पाइपलाइनद्वारे पाणी जोगेश्वरी डोंगररांग परिसरात आणण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या माध्यमातून सोना, हिवरा, इंद्रायणी (तलवार), तिनधारी, खटकाल, मनुदेवी आणि अग्नावती या नद्यांच्या उगमस्थानी पाणी पोहोचविण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.
या प्रकल्पामुळे हिवरा, पिंपरी मध्यम प्रकल्प, पद्मावतीसह परिसरातील विविध मध्यम व लघू सिंचन प्रकल्प, पाझर तलाव आणि जलसाठे भरून निघतील. परिणामी भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी, नाले आणि नद्या वर्षभर पाण्याने समृद्ध राहण्यास मदत होईल. यामुळे शेती, जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
पैठण ते जोगेश्वरी डोंगररांग हा मार्ग भौगोलिकदृष्ट्या तुलनेने सुलभ असल्याने कमी खर्चात हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो, असा दावा करत राज्य शासनाने या नदीजोड प्रकल्पाचा गांभीर्याने विचार करून अग्रक्रमाने कार्यवाही करावी, अशी मागणी सुनील पाटील यांनी केली आहे.






