ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 30 जून: पाचोरा-भडगाव शहरासह ग्रामीण भागात स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविला असून, वाढीव वीजबिलांच्या तक्रारी तत्काळ थांबवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महावितरण कंपनीला देण्यात आला आहे.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर गुणवंतराव बारवकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे कार्यकारी अभियंता, पाचोरा यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, पाचोरा व भडगाव परिसरात अद्यापही वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्या कायम आहेत. अशा परिस्थितीत स्मार्ट मीटर बसविणे ग्राहकांच्या हिताचे नसून, नव्या मीटरच्या अचूकतेबाबत तसेच वाढीव वीजबिलांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांच्या संमतीशिवाय किंवा पूर्वकल्पना न देता स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करण्यात येऊ नये. तसेच पाचोरा शहरातील ग्राहकांना अवाजवी वीजबिले देण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने त्याची तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय मागे घेऊन ग्राहकांची फसवणूक थांबवावी, अन्यथा शिवसेना व युवासेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच नागरिकांना कोणत्याही प्रकारचे वीजबिल भरण्यास प्रवृत्त केले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. भविष्यात या आंदोलनातून कोणताही कायदेशीर प्रश्न निर्माण झाल्यास त्यास महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी गटनेते सुमित किशोरआप्पा पाटील, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, नगरसेवक सतीश चेडे, प्रदीप वाघ, अशोक पाटील, प्रवीण ब्राम्हणे, संजय चौधरी, शाहीद शेख, संजय गोहील, किशोर पाटील, विकी बाविस्कर, भोला पाटील, नितीन चौधरी, पिंटू शिंदे, बंडू सोनार, अनिल पाटील, सुनील गौड, भूषण अहिरे, आकाश पाटील, भुत्ता चौधरी, भैय्या चौधरी, अतुल महाजन, आबा पाटील, सौरभ चेडे, तुषार पाटील, जय बारवकर, नयन तांदळे, साई सिसोदिया, श्याम पाटील, किरण परदेशी यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा: VIDEO | शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट; ३० जूनबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले?






